श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हंडवाऱ्याजवळ क्रालगुंड गावात रात्रीपासून चकमक सुरू आहे. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलाय. सुरक्षा दलानं हंदवाडाच्या बांदरपेई भागातील चकमकीत गुरुवारी या दहशतवाद्याला कंठस्नान घातलंय. दरम्यान याच भागात आणखीन एक दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शंका आहे. त्याच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सर्च ऑपरेशन सुरू असताना बुधवारी रात्री ९.३२ च्या सुमारास आर्मीच्या पेट्रोलिंग युनिटवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.


घटनास्थळावर अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. घटनास्थळावरून शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या भागातली इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केली आहे.


यापूर्वी,  ५ मार्च रोजीही जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले होते. यातील एक दहशतवादी त्रालचा गुलशनपुराचा रहिवासी अदफर फयाज पर्रे तर दुसरा त्रालच्या शरीफाबाद निवासी इरफान अहमद राठर असल्याचं समजतंय. चकमक झालेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हत्यारं, स्फोटकं आणि वस्तू जप्त करण्यात आल्यात.