श्रीनगर : भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीनंतर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची कसरत सुरू झाली आहे. लष्कर, केंद्रीय पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गेल्या 24 तासांत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला असून त्यात एके-56, ग्रेनेडचा समावेश आहे. ठार झालेल्या 4 दहशतवाद्यांपैकी 3 पाकिस्तानी होते. तर एकाची ओळख पटवली जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 15 दिवसांत दोन बैठका घेतल्या आहेत. 3 जूनच्या बैठकीत अमित शाह यांनी सर्व एजन्सी आणि सुरक्षा दलांना जम्मू-काश्मीरची शांतता बिघडवणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून ठार करण्याचे निर्देश दिले होते.


शहा यांची उच्चस्तरीय बैठक 


काश्मीरची शांतता बिघडवण्यासाठी दहशतवाद्यांनी यापूर्वी निरपराध लोकांची टार्गेट किलिंग केली होती. त्यानंतर तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पळून जाण्याची धमकीही दिली होती. यानंतर गृहमंत्र्यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावून नवी रणनीती आखून दहशतवाद्यांना घेरण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर निरपराधांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा 24 तासांच्या आत सुरक्षा दलांनी खात्मा केला.


2012 मध्ये पंतप्रधान पॅकेज अंतर्गत नियुक्त झालेल्या राहुल भट यांच्या हत्येपासून काश्मिरी पंडित सातत्याने आंदोलन करत आहेत. भट यांची 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर, वेगळ्या घटनांमध्ये, काश्मीरमध्ये एक बँक कर्मचारी आणि वीटभट्टी कामगार ठार झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला.


1 मे पासून बँक कर्मचाऱ्याची हत्या ही काश्मीरमधील नववी आणि कामगाराची दहावी निवडक हत्या होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील एका शिक्षकाची कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 18 मे रोजी दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील दुकानात घुसून बॉम्ब फेकले, त्यात एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. 24 मे रोजी श्रीनगरमध्ये सैफुल्ला या पोलीस कर्मचाऱ्याची त्याच्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर, दोन दिवसांनी अमरीन भट्टला बडगाममध्ये ठार मारण्यात आले.