नवी दिल्ली: संदेसरा समूहाच्या ५००० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक अचानक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 'ईडी'च्या तीन अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या 'ईडी'च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. यापूर्वी 'ईडी'कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी करण्यात आली होती. यानंतर 'ईडी'कडून अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 
मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करून अहमद पटेल यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले होते. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे सरकारी नियमावलीनुसार मी चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे अहमद पटेल यांनी 'ईडी'ला कळवले होते. त्यामुळे आता 'ईडी'कडून एक पथक त्यांच्या घरी पाठवण्यात आले. 

स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठी नावे गुंतल्याची शक्यता आहे. तब्बल १४५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत. 



 ईडीच्या तपासात संदेसरा समूहाने भारतीय बँकांच्या परदेशांतील शाखांमधूनही तब्बल ९००० कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ईडीने संदेसरा समूहाची परदेशातील ९७७८ कोटींची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये नायजेरियातील तेल खाणी, विमाने, जहाजे आणि लंडनमधील घराचा समावेश आहे. 
 संदेसरा समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने भारतामध्ये २४९ आणि परदेशात ९६ बनावट कंपन्या सुरु केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातूनच पैसा इतरत्र वळवला जायचा आणि सरतेशेवटी तो नायजेरियात आणला जायचा.