लोको पायलटशिवाय १३ किमी धावले इंजिन, फिल्मी स्टाईलने केला पाठलाग
कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील वाडी स्थानकावरुन रेल्वेचे इंजिन लोको पायलटविना तब्बल १३ किमी धावले. यावेळी एका रेल्वे कर्मचाऱ्यांने फिल्मी स्टाईलने बाईकच्या सहाय्याने पाठलाग करत इंजिन थांबवले.
कलबुर्गी(कर्नाटक) : कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील वाडी स्थानकावरुन रेल्वेचे इंजिन लोको पायलटविना तब्बल १३ किमी धावले. यावेळी एका रेल्वे कर्मचाऱ्यांने फिल्मी स्टाईलने बाईकच्या सहाय्याने पाठलाग करत इंजिन थांबवले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तीन वाजण्याच्या सुमारास चेन्नई-मुंबई ट्रेन वाडी स्थानकात जेव्हा डब्यांना डिझेल इंजिन जोडण्यासाठी थांबली होती तेव्हा ही घटना घडली. वाडी ते राज्यातील सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विद्युतीकरण नसल्याने ट्रेनचे डबे डिझेल इंजिनला जोडले जाणार होते.
अधिकारी पुढे म्हणाले, सोलापूरच्या दिशेने रवाना होण्याआधी मुंबई ट्रेनला नियमितपणे डिझेल इंजिन जोडले जाते. मात्र यादरम्यान लोको पायलट खाली उतरल्यानंतर चुकीने इलेक्ट्रिक इंजिन सुरु झाले.
इंजिन सुरु झाल्याची गोष्ट रेल्वे कर्मचाऱ्याला समजताच त्याने बाईकने इंजिनचा पाठलाग करण्यास सुरवात केली आणि यात तो यशस्वी झाला. लोको पायलटशिवाय इंजिन तब्बल १३ किमी धावले. अखेर रेल्वे कर्मचाऱ्याने बाईकच्या मदतीने इंजिनचा पाठलाग करत ते रोखले.