भोपाळ : मुख्यमंत्र्यांची झोपमोड केल्याने थेट एका ज्युनियर इंजीनिअरला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ज्युनियर इंजीनिअरला निलंबित केलं आहे. या निलंबनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकृष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आपला दौरा आटोपून मुख्यमंत्री जेव्हा शासकीय विश्रामगृहावर रात्री झोपायला पोहोचले, तेव्हा काही मिनिटातच डासांनी कहर केला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना डासांच्या चाव्यामुळे उठून बसावे लागले. या विश्रामगहात मच्छरदाणीची ही सोय नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना रात्री मुक्काम करता यावा यासाठी विश्रामगृहाची सोय असते, यावर शासनाचा मोठा खर्च होतो, तरी देखील तेथे गैरसोय होत असल्याचं समोर आलं. रात्री अडीच वाजता मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. यानंतर या रुममध्ये औषधाची फवारणी करण्यात आल्यानंतर त्यांना कुठेतरी झोप लागली. 



पण मुख्यमंत्र्यांची झोपमोड अजून काही थांबत नव्हती. कारण सकाळी साडेचारला पुन्हा छतावरील टाकी ओव्हरफ्लो झाली आणि ते पाणी तासाभरापासून वाहत होतं असं निदर्शनास आलं. या सर्व गैरसोयीबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका ज्युनियर इंजीनिअरला संबंधित अधिकाऱ्यांनी निलंबित केलं आहे.


मध्यप्रदेशातील सीधी येथे झालेल्या बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे गेले होते. रात्री १२ च्या सुमारास ते झोपायला आले, पण डासांनी त्यांची झोपमोड केली, सकाळची झोपही टाकीच्या पाण्याच्या ओव्हरफ्लोच्या आवाजात गेली. याविषयी रिवा विभागाचे कमिश्नर राकेश कुमार यांची मु्ख्यमंत्र्यांनी सकाळी चांगलीच कानउघाडणी केली.