मुंबई: भाजपमध्ये माझ्या वडिलांना पूर्वीसारखा सन्मान मिळत नव्हता. त्यांनी फार पूर्वीच पक्षातून बाहेर पडायला पाहिजे होते, असे मत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने व्यक्त केले. एका कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तिला शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजपमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाविषयी विचारले. त्याला उत्तर देताना सोनाक्षीने म्हटले की, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता. तुम्ही एखाद्या ठिकाणी आनंदी नसाल तर तुम्ही बदल कराया पाहिजे. माझ्या वडिलांनीही तेच केले. मला आशा आहे की, आता काँग्रेससोबत ते आणखी चांगली कामे करू शकतील. मुख्य म्हणजे त्यांची कुचंबणा होणार नाही, असे सोनाक्षीने म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटणा साहिबमधून शत्रुघ्न सिन्हांचा पत्ता कट, रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी


यावेळी सोनाक्षीने भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांना मान मिळत नसल्याचेही अप्रत्यक्षपणे सूचित केले. माझे वडील सुरुवातीपासून भाजपसोबत होते. जे.पी. नारायण, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात त्यांना पक्षात मानाचे स्थान होते. मात्र, आता संपूर्ण पक्षाकडूनच त्यांचा पुरेसा मान राखला जात नव्हता. खरंतर त्यांनी यापूर्वीच भाजपमधून बाहेर पडायला पाहिजे होते, त्यांनी बराच उशीर केला, असेही सोनाक्षीने यावेळी सांगितले. 



शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. मात्र, भाजपमध्ये राहूनही त्यांनी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली. बंडखोरी केल्यामुळंच यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापण्यात आले. यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.