सावधान ! ...तर तुमचं पीएफ अकाऊंट होऊ शकतं रिकामं
फसवणुकीचे प्रकार वाढले
मुंबई : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. लोकांच्या मोबाईलवर फोन करुन त्यांच्याच खात्यातील पैसे उडवण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बँक खात्याची माहिती, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डची माहिती विचारुन लोकांच्या अकाऊंटमधील पैसे गायब केले जातात. बँकांकडून सतत याबाबत जनजागृती केली जाते. बँक कधीही कोणतीही माहिती घेण्यासाठी ग्राहकांना फोन करत नाही. बँके संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर ते बँकेत जावूनच सांगितली पाहिजे.
पण आता ऑनलाईन फसवणूक करणाऱे थेट लोकांच्या पीएफ अकाऊंटवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लोकांना याबाबत सावध केलं आहे. EPFO ने आपल्या ग्राहकांना म्हटलं आहे की, तुम्हाला पीएफ ऑफीसमधून बोलतो आहे. असं सांगून तुमची माहिती विचारत असेल तर त्यांना आपली माहिती देवू नका. ईपीएफओ कधीच आपल्या ग्राहकांना फोन करत नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.
ईपीएफओ (EPFO)मध्ये देशभरातील जवळपास ६ कोटी ग्राहकांचे अकाऊंट आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत लोकांना सावध केलं आहे. ग्राहकांनी यामुळे जागरुक राहण्याची गरज आहे. पीएफ अकाऊंटची माहिती कोणालाच देऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
ईपीएफओ कधीच आपल्या ग्राहकांना त्यांचा आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, यूनिवर्सल अकाउंट नंबर किंवा बँक खात्याची माहिती मागत नाही. किंवा ईपीएफओ कधीच त्यांनी जमा केलेल्या पैशांची विचारणा करत नाही.
तुम्हाला जर कोणाचाही फोन आला आणि तो तुमची कोणतीही माहिती मागत असेल तर अशा लोकांपासून सावध राहा. नाहीतर तुमच्या खात्यातील पैसे गायब होतील.