EPFO खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता थेट ATM मधून पैसे काढता येणार
EPFO Update: ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पीफ खातेधारकांना आता थेट एटीएममधून पीएफ रक्कम काढता येणार आहे.
Employee Provident Fund (EPF) Update: सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक नवी सुविधा आणण्याच्या दिशेनं काम करत आहे. ज्यामुळे सदस्यांना त्यांच्या कॉर्पसमधून एटीएम कार्डद्वारे निधी काढता येणं शक्य होणा आहे. EPFO मधून एटीएम कार्डच्या आधारे पैसे काढण्याची ही सुविधा पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत येऊ शकते अशी अधिकाऱ्याची माहिती आहे. हे पैसे काढण्याला विशिष्ट मर्यादा असेल असंही समजत आहे.
EPFO 3.0 अंतर्गत आपल्या आयटी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने काम करत आहे. याचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये संपणार आहे. जून 2025 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आयटी अपग्रेड पूर्ण झाल्यानंतर EPFO निधीतूव पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची सुविधा आणली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
“गेल्या 5-6 महिन्यांत EPFO मध्ये आयटी प्लॅटफॉर्म आणि इतर प्रक्रिया सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे बदल EPFO 3.0 योजनेअंतर्गत केले जात आहेत. आम्ही ही सुविधा आणू इच्छितो ज्यामध्ये EPF सदस्यांकडे एटीएम कार्डासारखे कार्ड असेल आणि नंतर बँक-प्रकारच्या सुविधेत, जेणेकरुन त्यांना त्यांचे पैसे काढता येतील. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते पैसे काढू शकतील. थोडक्यात 50 टक्के म्हणा. स्वत:चे पैसे काढण्यासाठी लोकांकडून परवानगी का घ्यावी? या प्रस्तावामागे हीच कल्पना आहे,” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.
एकदा काढलेल्या रकमेची कमाल मर्यादा निश्चित केल्यावर, ईपीएफमधून सदस्यांना फक्त कार्ड स्वाइप करून त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसावी, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
त्याच धर्तीवर, EPFO पेन्शन योगदान लवचिक बनविण्याची योजना आखत आहे. या प्रस्तावात, कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) विद्यमान 12 टक्के मर्यादेपेक्षा अधिक किंवा कमी योगदान देण्याची लवचिकता असेल. “काही लोकांना त्यांच्या वेतनाच्या 10 टक्के पेन्शनमध्ये योगदान द्यावेसे वाटेल, तर काहींना 12 टक्के किंवा 15 टक्के योगदान द्यावे लागेल. काही लोक ठराविक वर्षांसाठी योगदान देऊ इच्छितात आणि नंतर थांबतात. ही लवचिकता कुठेतरी कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे आणि आम्ही त्या दिशेने काम करत आहोत, ”अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
सध्या कर्मचारी EPS अंतर्गत पेन्शन योजनेत योगदान देत नाहीत. कर्मचारी आणि कंपनी दोघेही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के, महागाई भत्ता आणि रिटेनिंग भत्ता, जर असेल तर, EPF मध्ये योगदान देतात. कर्मचाऱ्यांचे संपूर्ण योगदान EPF मध्ये जाते, तर कंपन्यांचे 12 टक्के योगदान EPF मध्ये 3.67 टक्के आणि EPS मध्ये 8.33 टक्के असे विभागले जाते. भारत सरकार 15,000 रुपयांच्या वेतन मर्यादांपेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 1.16 टक्के योगदान देते.