गडचिरोलीत चकमकीदरम्यान पोलिसांकडून 13 नक्षलवादी ठार
अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई : गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांना 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. गडचिरोलीतील एटापल्लीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून ही कारवाई करण्यात आली. पण अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डीआयजी संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोलीतील एटापल्ली जंगलात पोलिसांच्या कारवाईत 13 नक्षलवादी ठार झाले आहेत.
त्याचबरोबर एटापल्लीच्या जंगलात 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर काही नक्षलवादी गंभीर जखमी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी ग्रॅनाइटने हल्ला केला होता. नक्षलवाद्यांचा हा प्रयत्न अत्यंत मोठी घटना होती. नक्षवाद्यांच्या या कुरापतीनंतर पोलीस देखील सतर्क झाले.