नवी दिल्ली : युरोपियन संघ (ईयू) चं संसदीय प्रतिनिधीमंडळ २९ ऑक्टोबर रोजी काश्मीर दौरा करणार आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादं परदेशी शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये पाहणी करणार आहे. २१ जणांचं हे शिष्टमंडळ दिल्लीहून काश्मीरला रवाना झालंय. ११ वाजेच्या दरम्यान हे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिष्टमंडळ काश्मीरमध्ये येत आहे. हे शिष्टमंडळ काश्मीरचे राज्यपाल, खासदार आणि तरुणांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे या शिष्टमंडळाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरला रवाना होण्यापूर्वी युरोपियन खासदारांच्या या प्रतिनिधीमंडळानं सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोवाल यांची भेट घेतली. अमेरिका आणि इतर देशांकडून काश्मीरला दिलेल्या विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणल्यानंतर तिथल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली गेलीय. यामुळे या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय.  


'हे प्रतिनिधीमंडळ आपलं अधिकृत प्रतिनिधिमंडळ नाही' असं नवी दिल्ली स्थित युरोपीय संघाच्या शाखेकडून स्पष्ट करण्यात आलंय. या प्रतिनिधीमंडळात यूके, फ्रान्स, इटली, पोलंड, जर्मनी या देशांचे सदस्य आहेत. त्यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेतली.


राहुल गांधींनी साधला निशाणा


दरम्यान, 'काश्मीरमध्ये जाण्यापासून भारतीय खासदारांना रोखलं जातं पण परदेशी नेत्यांना मात्र तिथं जाण्याची परवानगी दिली जाते, यात काही ना काही चुकीचं आहे' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.


राहुल गांधी यांचं ट्विट

दहशतवादी कारवाया सुरूच


या शिष्टमंडळाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येलाच दहशतवाद्यांनी अपेक्षेप्रमाणे धुमाकूळ घातलाय. काल सोपर आणि अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना बॉम्ब हल्ले आणि हत्येचा सिलसिला सुरू ठेवला. काश्मिरातील व्यापार व्यवस्था अस्थिर करण्यासाठी दहशतवाद्यांनी ट्रक चालकांना लक्ष्य केलंय.