`100 मोदी आणि शाह आले तरी...`; जाहीर सभेतील भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं विधान
2024 Loksabha Election: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करताना आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील भाकित व्यक्त केलं आहे.
2024 Loksabha Election Congress: नागालॅण्डमधील निवडणूक प्रचारसभेमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी 2024 मध्ये काँग्रेसच विरोधी पक्षांच्या गटाचं नेतृत्व करेल असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीला पराभूत करतील असं सांगताना सर्व विरोधी पक्षांबरोबर चर्चा सुरु असल्याचं खर्गेंनी नमूद केलं. मल्लिकार्जुन खर्गे यांनी (पंतप्रधान नरेंद्र) मोदींनी (PM Modi) अनेकदा, 'मी एकटा व्यक्ती आहे जो देशचा सामना करु शकतो. इतर कोणी माझ्या आसपासही नाही,' असं म्हटल्याचा उल्लेख करत लोकशाहीमध्ये कोणतीही व्यक्ती असं विधान करणार नाही असा टोला लगावला. "तुम्ही लोकशाहीमध्ये राहता. तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्याकडे अमर्याद सत्ता नाही. तुम्ही हुकूमशाह नाही. तुम्ही लोकांमधून निवडून आला आहात. लोकच तुम्हाला धडा शिकवतील," असा इशारा खर्गेंनी दिला.
100 मोदी आणि शाह आले तरी...
मल्लिकार्जुन खर्गे यांनी, "2024 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात विरोधी पक्षांच्या आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेस नेतृत्व करेल. आम्ही इतर पक्षांबरोबर चर्चा करत आहोत. असं झालं नाही तर लोकशाही आणि संविधान नष्ट होईल," असंही म्हटलं. "प्रत्येक पक्षाला आम्ही फोन करत आहोत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत. आम्ही आमचे विचार त्यांच्यासमोर ठेवत आहोत. भाजपाला बहुमत मिळणार नाही. अन्य पक्षांच्या मदतीने आम्ही बहुमत मिळवून... 100 मोदी आणि शाह आले तरी भाजपा जिंकणार नाही," असं खर्गे म्हणाले.
त्यांना 1947 आठवत नाही
"आमच्या लोकांनी म्हणजेच काँग्रेसच्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले प्राण दिले. तुमच्यापैकी कोणीही हे केलं नाही. भाजपाच्या लोकांनी मला हे सांगावं की एखादा तरी भाजपा नेता देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढला आहे किंवा स्वातंत्र्यासाठी लढला आहे का? तुरुंगात गेला आहे का? या उलट ज्या व्यक्तीने स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या महात्मा गांधींचा त्यांनी प्राण घेतला. असे लोक देशभक्तीबद्दल बोलतात. देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा गांधींनी प्राणांची आहुती दिली. देशाच्या एकात्मतेसाठी राजीव गांधींनी प्राणाची किंमत मोजली. त्यांना वाटतं की त्यांनी 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळवलं. त्यांना 1947 आठवत नाही," अशी टीका खर्गे यांनी भाजपाला लक्ष्य करताना केली.
मेघालय आणि नागालॅण्डमध्ये सोमवारी विधानसभेच्या निवडणुकींसाठी मतदान होणार आहे. त्रिपुरामध्ये मागील आठवड्यात मतदान झालं. याच निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये खर्गे बोलत होते.