हैदराबाद: राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठे विदुषक आहेत, अशी बोचरी टीका तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली. तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आगामी निवडणुकांच्यादृष्टीने आपल्या पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठे विदुषक आहेत, हे प्रत्येकालाच माहिती आहे. संसदेत पंतप्रधान मोदींना मिठी मारताना आणि डोळे मिचकावताना संपूर्ण देशाने त्यांना पाहिले आहे. त्यामुळे आमच्यासारख्या विरोधकांसाठी ते एकप्रकारे 'भांडवला'प्रमाणे आहेत. ते जितक्या वेळा तेलंगणाचा दौरा करतील तेवढ्याचा आमच्या जागा वाढतील, असे के.चंद्रशेखर राव यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी चंद्रशेखर राव यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचेही जाहीर केले. मात्र, एमआयएम आमचा मित्रपक्ष असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 




चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी तातडीने कॅबिनेटची बैठक बोलावली. यावेळी तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामुळे आता तेलंगणात मुदतपूर्व निवडणुका होणार आहेत. 


कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यपाल एस. एल. नरसिम्हन यांची भेट घेतली व विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे सुपुर्द केला. राज्यपालांनी चंद्रशेखर राव यांचा प्रस्ताव स्वीकारला असून त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे.