नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूक मतदान झाले. मात्र, दोन दिवस बाकी असताना ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही शंका उपस्थित करीत ट्विट केले आहे. तर आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर लोकसभा निवडणुकांच्या निकालांआधी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकवार ईव्हीएमवर हल्लाबोल केला आहे. आज दिल्लीत चंद्राबाबू नायडू यांच्यापुढाकाराने १९ विरोधी पक्षांनी ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणाऱ्या सर्व ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मुखर्जी यांनी म्हटलेय. याबाबत मुखर्जी यांनी एक निवदेन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे, आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांना आव्हान देईल, अशा शक्यतांना कोणतेही स्थान असू नये. जनादेश पवित्र आहे आणि तो कोणत्याही प्रकारच्या संशयापलीकडचा असायला हवा.



दरम्यान, एक्झिट पोलनंतर विरोधकांनी १०० टक्के ईव्हीएम व्हीव्हीपॅटशी पडताळून पाहावेत, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. मात्र, सर्व ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 




दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप वेळ असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडीओंमध्ये ईव्हीएम मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं दिसत आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी ट्विट केले आहे.