Ex CM Hits Back At Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर माजी मुख्यमंत्र्यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाची ओळख असलेली लाल रंगाची गांधी टोपी ही 'काळ्या कर्माची' निशाणी असल्याचा टोला आदित्यनाथ यांनी लगावला होता. याच टिकेवरुन माजी मुख्यमंत्र्यांनी जे टीका करत आहेत त्यांनाच टोपीची गरज असल्याचं म्हटलं आहे. आदित्यनाथ यांनी 'टोपी लाल असली तरी कर्म काळी आहेत,' असा टोला समाजवादी पक्षाला लगावला होता. तसेच या पक्षाचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये त्यांनी अनेक वाईट कामं केल्याचं दिसतं असंही आदित्यनाथ म्हणालेले.


आदित्यनाथ नेमकं काय म्हणालेले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी कानपूर येथील नोकरीसंदर्भातील मेळाव्यामध्ये बोलताना आदित्यनाथ यांनी "2017 आधी उत्तर प्रदेश स्वत:ची ओळख बनवण्यासाठी धडपडत होता. या ठिकाणी अनागोंदी माजली होती. कायदा नसणारं राज्य अशी ओळख निर्माण झालेली. प्रत्येक सणाआधी इथे दंगली व्हायच्या. इथे मुली आणि उद्योजक सुरक्षित नव्हते," असं म्हटलं होतं. तरुणांना इच्छा नसताना राज्य सोडावं लागत होतं, असंही मुख्यमंत्री आधीच्या सरकारवर टीका करताना म्हणाले होते. 


"समाजवादी पक्षाने कशाप्रकारे राज्याला चुकीच्या मार्गावर नेलं सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही इतिहासाची पानं उलटून पाहिली तर समाजवादी पक्षाची कारकिर्द पूर्णपणे काळवंडलेली दिसेल. समाजवादी पक्षाची टोपी लाल असली तरी त्यांची कर्म काळी आहेत. ते त्यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत आहेत," असं मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले होते. त्यालाच आता समाजवादी पक्षाचे प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अखिलेश यादव यांनी उत्तर दिलं आहे. 


निराशा दर्शवणारं विधान


मुख्यमंत्र्यांनी केलेलं लाल टोपीसंदर्भातील विधान हे त्यांची निराशा दर्शवतं असंही समाजवादी पार्टीच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचं हे विधान म्हणजे त्यांना उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभवामुळे आलेली निराशा दर्शवणारं आहे, असं अखिलेश म्हणाले. "उत्तर प्रदेशमधील पराभव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पचवू शकलेले नाहीत. याच धक्क्यातून ते अशा प्रकारची विधानं करत आहेत," असं अखिलेश म्हणाले. 


आमच्या डोक्यावर केस


यासंदर्भात बोलताना अखिलेश यादव यांनी, "लाल हा भावनांचा रंग आहे. लाल हा देवी दुर्गामातेचा रंग आहे," असं म्हटलं. कनौंजमध्ये समर्थकांच्या भेटीसाठी आलेल्या अखिलेश यांनी इंडिया टुडेशी बोलताना, "ते आमच्या टोपीचा अपमान करत आहेत तरी आम्ही त्यांच्याशी चांगलं वागतोय. किमान आमच्या डोक्यावर केस तरी आहेत. त्यामुळेच आम्ही टोपी घालतोय. ज्यांना केस नाही त्यांनीही टोपी घालावी," असा खोचक टोला लगावला होता.