राजस्थानचे माजी मंत्री आणि भरतपूरच्या राजघराण्यातील सदस्य विश्वेंद्र सिंह यांनी पत्नी आणि मुलाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आणि मुलगा आपल्याला मारहाण करत असून, पुरेसं जेवण देत नाहीत. तसंच लोकांना भेटण्याची परवानगीही देत नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पत्नी आणि मुलाने देखभाल खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी यापूर्वी उपविभागीय अधिकारी न्यायाधिकरणात त्यांची पत्नी, माजी खासदार दिव्या सिंह आणि मुलगा अनिरुद्ध सिंह यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नी आणि मुलाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण याप्रकरणी खरे पीडित आहोत असा दावा त्यांनी केला आहे. "हा एसडीएमवर दबाव आणण्याचा डावपेच असून दुसरं काही नाही. माझी आई आणि माझा एसडीएम कोर्टावर आणि माननीय न्यायाधीशांवर सर्वांत जास्त विश्वास आहे. ते हे प्रकरण चोखपणे आणि निष्पक्षतेने हाताळतील. हे प्रकरण नवीन नाही.  6 मार्च 2024 पासून हे सुरु आहे,” अलं त्यांचा मुलगा अनिरुद्ध सिंग याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 


दरम्यान विश्वेंद्र सिंग यांनी उपविभागीय अधिकारी न्यायाधिकरणात दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे की, "मला माझं घर (मोती महल) सोडण्यास भाग पाडण्यात आलं आहे. मी भटक्यांचं जीवन जगत आहे. मला कधी सरकारी घरात तर कधी हॉटेलमध्ये राहावं लागत आहे. मला एका खोलीत बंदिस्त करण्यात आले आहे. मी भरतपूरला आल्यावर, मला घरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. आता माझी पत्नी आणि मुलासोबत घरात राहणं शक्य नाही". विश्वेंद्र सिंग यांनी पत्नी आणि मुलाकडून महिन्याला 5 लाख रुपयांची मागणी केली आहे. 


कोर्टात दिलेल्या अर्जात विश्वेंद्र सिंह यांनी पत्नी आणि मुलावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. "माझी हत्या कऱण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यानंतर ते सर्व मालमत्ता हडप करू शकतात. भविष्यात कदाचित त्यांच्या वागणुकीत सुधारणा होईल, असं मला वाटत होतं, परंतु तसं झालं नाही. माझ्या पत्नी आणि मुलाने माझ्या एका खोलीला कुलूप लावलं आणि जबरदस्ती बाहेर काढलं. मी शक्य तेवढे कपडे जमा करुन घर सोडलं आहे. तेव्हापासून मी असंच जगत आहे".


सिंग यांनी हृदयाचे रुग्ण असल्याचंही सांगितलं आहे. "उपचारादरम्यान दोन स्टेंट टाकल्यामुळे मी तणाव सहन करू शकत नाही. तणाव माझ्या शरिरासाठी घातक आहे. मला 2021 आणि 2022 मध्ये दोनदा कोरोना झाला, पण माझ्या मुलाने आणि पत्नीने कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक मदत केली नाही," असा आरोप त्यांनी केला आहे. 


"माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्ती माझ्या नावे केली आहे. माझ्या पत्नीने आणि मुलाने माझे कपडे विहिरीत फेकले. त्यांनी कागदपत्रे, नोंदी वैगैरे फाडून टाकल्या आणि खोलीतील सामान बाहेर फेकले. त्यांनी चहा-पाणी देणं बंद केले आहे. माझ्या पत्नी आणि मुलालाही सोशल मीडियाद्वारे माझी बदनामी करण्यापासून रोखलं पाहिजे,” अशी मागणी विश्वेंद्र सिंग यांनी केली आहे. 


विश्वेंद्र सिंग यांनी एसडीएमला दिलेल्या अर्जात मोती महल पॅलेसची मालमत्ता परत करावी, अशी मागणी केली आहे. यामध्ये मथुरा गेट पोलिस स्टेशन हद्दीतील मोती महल, कोठी दरबार, गोलबाग कॉम्प्लेक्स आणि सूरज महल यांचा समावेश आहे. पण मुलाने हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत फेटाळले आहेत. 


अनिरुद्ध सिंह यांनी रविवारी सांगितलं की, मारहाण आणि जेवण न दिल्याचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. गरज पडल्यास माझ्या वडिलांविरुद्ध आर्थिक फसवणूक आणि चुकीच्या मालमत्तेची विक्री केल्याचा पुरावा एसडीएम न्यायालयात सादर केला जाईल, असं ते म्हणाले आहेत.