सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : Independence Day 2022: देशाच्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येकजण आपआपल्या परिनं या दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सानथोरांपासून प्रत्येकाच्याच मनात या दिवसाच्या निमित्तानं अभिमान आणि प्रचंड आनंद भावना दाटून आल्या आहेत. अशा या दिवसाचं औचित्य साधत देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतानाच एका अवलियानं त्याच्या अनोख्या, नव्हे तर थरारक शैलीत देशाला सलाम केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अवलिया म्हणजे रोहित वर्तक (Rohit Vartak). स्लॅकलाईन/ हायलाईन अर्थात हवेत दोन सुळक्यांना किंवा ठराविक उंचीवर जोडून असणाऱ्या गोष्टींना बांधलेल्या लहानशा दोरीवजा पट्टीवरून चालत जाण्याचा पराक्रम. हे असं चौकटीबाहेरचं काहीतरी  करणारा रोहित देशातील Adventure Lovers मध्ये भलताच लोकप्रिय. (Exclusive 75 Independence Day Rohit vartak slack liner slatutes nation from 200 feets watch thrilling video)


Independence Day 2022 चं निमित्त समोर ठेवत याच रोहितनं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोनशे ते सव्वादोनशे फूट उंचीवरून त्यानं ड्यूक्स नोज येथील सुळक्यांमधलं अंतर स्लॅकलाईनवरून अवघ्या पाच-सात मिनिटांत पूर्ण केलं. 



एकाग्रता, प्रचंड आत्मविश्वास आणि देशप्रेमाच्या बळावर त्यानं काळजाचा ठोका चुकवणारा हा पराक्रम केला. रोहितनं हा व्हिडीओ एप्रिल महिन्यात चित्रीत केल्याचं सांगत या एका व्हिडीओसाठीची तयारी आणि सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी त्याला आणि त्याच्या टीमला 2-3 तासांचा कालावधी लागला होता. 


रोहितचा हा Video पाहताना त्याचा हाती असणारा आणि वाऱ्याच्या झोतावर फडकणारा तिरंगाच त्याला आत्मविश्वास देऊन गेला असणार यावर नकळतच आपणही विश्वास ठेवत आहोत. त्याच्या या साहसाला सलाम!