सियाचीन : देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी जवान सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. वाळवंटातील सूर्याच्या दाहकतेपासून ते अगदी रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ प्रदेशांपर्यंत प्रत्येक ठिकाणी जवानांची करडी नजर असते. भारताच्या सीमांतर्गत भागांपैकी असाच एक अतिशय आव्हानात्मक भाग म्हणजे सियाचीनची युद्दभूमी. जगातील सर्वाधिक उंचीवर असणारी युद्धभूमी म्हणून सियाचीनकडे पाहिलं जातं. इथे तापमानाचा पारा उणे ४० अंशांहूनही खाली जातो. ३ ते ४ हजार सैनिक तैनात असणाऱ्या या रणभूमीतून 'झी न्यूज' या आमच्या सहकारी वाहिनीने खास वार्तांकन करत त्या ठिकाणची काही खास माहिती सर्वांपुढे आणली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी 


सियाचीन ग्लेशियर ७६.४ किलोमीटरपर्यंत विस्तारलं आहे. इथे तापमान अनेकदा उणे ६० अंशांपर्यंतही पोहोचतं. इतकच नव्हे तर कित्येकदा या ठिकाणी ताशी २०० किमी इतक्या वेगाने हिमवादळही येतं. परिणामी येथे ४० फुटांपर्यंत बर्फ साचतो. अशा परिस्थितीत देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या जवानांना प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर बाळगावा लागतो. इथे बेस कॅम्पपासून चौकीपर्यंतची वाट सर करण्यासाठी २० ते २२ दिवसांचा कालावधी लागतो. या भागामध्ये एका जवानाता कमीत कमी तीन महिन्यांच्या काळासाठी गस्त गालावी लागते. 


सियाचीन युद्ध शाळा / सियाचीन बॅटल स्कूल 


या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर भागात जाणाऱ्या जवानांना प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण केंद्रामध्ये एता तुकडीत एकूण ३०० जवानांचा समावेश असतो. ज्यांना तीन आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येतं. आईस क्राफ्ट, रॉक क्राफ्ट आणि एवलांच म्हणजे हिमवादळासारख्या परिस्थितीचा सामना करण्याच्या पद्धतीचं प्रशिक्षण येथे देण्यात येतं. २०१२पासून ते २०१५ या काळापर्यंत करण्यात आलेल्या सैन्यदल कारवायांसाठी जवळपास ७,५०४.९९ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. याची दैनंदिन विभागवारी केल्यास सैन्याला दर दिवशी अन्नधान्य पुरवठ्यासाठी ६.८ कोटी रुपये इतका खर्च येतो. तर, सैनिकांना दिल्या जाणाऱ्या गरम कपड्यांसाठी ८०० कोटी रुपये इतका खर्च येतो. 



३५ वर्षांपूर्वी रचलेला पहिला कट 


सियाचीन ग्लेशियर भागावर ताबा मिळवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आहेत. ज्याची माहिती भारताला फार आधीच मिळाली. १३ एप्रिल १९८४मध्ये भारतीय सैन्याकडून 'ऑपरेशन मेघदूत' लाँच करण्यात आलं. ज्याअंतर्गत जगातील सर्वाधिक उंचीवर स्थिरावलेल्या या युद्धभूमीमध्ये भारताने पाकिस्तानचा सामना केला. ज्यामध्ये ग्लेशियरच्या बऱ्याच मुख्य भागांवर भारताने ताबा मिळवला. 


अतिशय कठीण परिस्थिती, शत्रूवर असणारी करडी नजर आणि हवामानाचा होणारा मारा या साऱ्यामध्ये देशाच्या रक्षणाची जबाबदारी अतिशय आत्मविश्वासाने पेलणाऱ्या या सैनिकांचा साऱ्या देशाला अभिमान आहेच. शिवाय ते ज्या परिस्थितीमध्ये वावरतात हे पाहता त्यांच्यासाठी असणारा आदर हा खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला असं म्हणायला हरकत नाही.