हरियाणातही भाजपला कौल, एक्झिट पोलनुसार जागा वाढणार
हरियाणा विधानसभेसाठी देखील मतदान झाले.
चंदीगड : महाराष्ट्राबरोबरच आज हरियाणा विधानसभेसाठी देखील मतदान झाले. याठिकाणी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या बाजुने कौल मिळालेला दिसून येत आहे. ९० जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताचा आकडा ४६ आहे. तर, विविध एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपला सरासरी ६३ जागा मिळण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे.
रिपब्लिकन जन की बातच्या पोलनुसार भाजपला ५२ ते ६३ जागा तर काँग्रेसला १५ ते १९ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर दुष्यंत चौटाला यांच्या ‘जेजेपी’ पक्षाला ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य पक्षांना ७ ते ९ जागा मिळतील असा अंदाज आहे.
एबीपी एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये भाजपला ७२ जागा मिळत असा अंदाज आहे, तर काँग्रेसचा धुव्वा उडण्याची शक्यता आहे. केवळ अवघ्या ८ जागा पदरात पडण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना सात ते दहा जागा मिळतील.
सीएनएन- न्यूज १८ इप्सोस एक्झिट पोलनुसार भाजपला ९० पैकी ७५ जागा तर काँग्रेसला १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. हरियाणातील ९० जागांसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले. एकूण ६१.६२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. तर १ हजार १६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.