नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) २०१९ या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर ६.१ टक्क्यावरून ४.८ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी ट्विट करून भाजपला टोला लगावला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर खाली आणला. त्यामुळे आता IMF आणि संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथन यांनी भाजप नेत्यांच्या टीकेसाठी तयार राहावे, असा टोला चिदंबरम यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ असणाऱ्या गीता गोपीनाथन यांनी मोदी सरकराच्या नोटबंदीच्या निर्णयावरही टीका केली होती. त्यामुळे आता भाजप सरकारच्या मंत्र्यांकडून होणाऱ्या टीकेसाठी त्यांनी सज्ज राहावे. 'आयएमएफ'ने २०१९ मध्ये भारताचा विकासदर केवळ ४.८ टक्के राहील, असे म्हटले आहे. मात्र, हेदेखील थोड्याफार उपायांनी साध्य होईल. अन्यथा विकासदर त्यापेक्षाही खाली गेल्यास त्यामध्ये नवल वाटून घेण्यासारखे काही नाही, असे चिदंबरम यांनी आपल्या ट्विटच्या मालिकेत म्हटले आहे. 




डावोस येथे होत असलेल्या जागितक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनापूर्वीच IMF ने हा अहवाल सादर केला. यामध्ये भारतारसाख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतील मंदीचा दाखला देत IMF ने २०१९ या वर्षासाठीचा जागतिक विकासदर अंदाजही २.९ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. त्यामुळे नजीकच्या काळात भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.