नवी दिल्ली: लडाखच्या गलवान परिसरात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत झालेले खरे नुकसान समोर येण्यास आता सुरुवात झाली आहे. आज दुपारी या झटापटीत भारताचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काहीवेळापूर्वीच या झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. झटापटीवेळी अनेक भारतीय जवान गंभीर जखमी झाले होते. यापैकी अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही वर्तविण्यात येत आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांना भिडले होते. या घटनेनंतर गलवान खोऱ्यातून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतले आहे. कालच्या झटापटीवेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला चढवला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही बाजूचे अनेक जवान गंभीर जखमी झाले. या झटापटीत भारतीय लष्कराच्या १७ भारतीय जवान गंभीर जखमी झाले होते. 



गलवान खोऱ्याचा प्रदेश अत्यंत उंचावर असल्याने सध्या येथील तापमानाचा पारा शून्य अंशांपेक्षाही खाली आहे. त्यामुळेच जखमी झालेल्या भारतीय जवानांचा मोठ्याप्रमाणावर मृत्यू झाल्याचे समजते. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, भारतीय जवानांनीही चिनी सैन्याला जोरदार तडाखा दिला आहे. भारतीय यंत्रणांच्या माहितीनुसार, या झटापटीत चीनचे ४३ जवान मृत्युमूखी पडले आहेत. तर अनेक चिनी जवान गंभीर जखमी झाले आहेत.


या घटनेनंतर सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांतील लष्करी आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. गलवान खोऱ्याच्या परिसरात चिनी हेलिकॉप्टर्सची ये-जा मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली.