पाकिस्तानात धर्मपरिवर्तन केलेल्या `त्या` हिंदू मुलींना कुटुंबाकडे सोपवा- सुषमा स्वराज
`त्या मुली अल्पवयीन आहेत`
नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी पाकिस्तानकडे धर्मपरिवर्तन करण्यात आलेल्या दोन हिंदू मुलींना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत सोपवण्यात यावं, अशी मागणी केली आहे. होळीच्या पूर्वसंध्येला या दोन्ही मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास लावत त्यांचं लग्न लावून देण्याची घटना सिंध प्रांतात घडली होती.
'त्या मुली अल्पवयीन आहेत. रवीना ही १३ आणि रीना ही अवघ्या १५ वर्षांची आहे', असं ट्विटमध्ये नमूद करत स्वराज यांनी इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानला उद्देशून वास्तव समोर ठेवलं. न्यायालयीन तरतुदींनुसार त्या दोन्ही मुलींना तातडीने त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात यावं, ही बाब त्यांनी उचलून धरली.
सोमवारी पोलीस तपासात उघड झाल्यानुसार जवळपास सातजणांचा या कृत्यात सहभाग होता. ज्यात निकाह ख्वान (लग्न लावून देणाऱ्या व्यक्तींपैकी एक)चाही समावेश होता. हिंदू धर्मिय बहिणींचं बळजबरीने इस्लाम धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांकडूनही विरोध करण्यात आला होता. कराची प्रेस क्लबच्या बाहेर, रविवारी याविरोधात निदर्शनं करण्य़ात आल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेच्या माध्यमातून पाकिस्तानात या दोन्ही मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध इस्लाम धर्म स्वीकारण्यास लागल्याची बाब समोर आली होती. ज्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्याच दिवशी भारताकडूनही या घटनेची विचारणा करत त्यावर कारवाईची मागणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सिंध प्रांतात या घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही अशा काही घटना येथे घडल्याची बाब पाकिस्तानातील मानवी हक्कांसाठी चळणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी मांडली.