नवी दिल्ली : महिला आणि पुरूष परस्पर सहमतीनं विवाहबाह्य संबंध ठेवत असतील, तर त्यात पुरुषाइतकीच महिलाही दोषी ठरली पाहिजे. एकद्या पुरुषाला दोषी मानता  येणार नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं नोंदवलंय. भारतीय दंड विधानातल्या व्यभिचारावर भाष्य करणाऱ्या कलमाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठानं हे मत मांडलं. 


अविवाहित पुरूष विवाहित महिलेशी शरिरसंबंध ठेवत असेल, तर तो व्यभिचार नसतो, यावर न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं. महिलादेखील यामध्ये समान भागिदार असते, असं न्यायालायनं म्हटलंय. विवाहित महिला पतीच्या सहमतीनं विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा नाही. याचा अर्थ महिला त्या पुरुषाची गुलाम आहे, असा घ्यायचा का, असा सवालही न्यायालयानं केलाय. या घटनापीठामध्ये न्या. आर.एफ. नरिमन, न्या. ए.एम. खानविलकर, न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता.