Indian Railways : ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो? यामागचं कारण खूपच रंजक
तुम्ही जर कधी ट्रेनमधून प्रवास केला असेल, तर तुम्ही पाहिलं असेल की ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या बोगी असतात
मुंबई : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. आपल्याला कुठे ही कमी पैशात आणि लवकर पोहोचायचे असेल तर, रेल्वेचा पर्याय हा एक चांगला पर्याय आहे. जो गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच परवडणारा असतो. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकं ट्रेनने प्रवास करतात. देशात 2,167 पॅसेंजर ट्रेन आहेत. त्याच वेळी, देशात दररोज 23 दशलक्ष प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनमध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आणि बोगी आहेत.
तुम्ही जर कधी ट्रेनमधून प्रवास केला असेल, तर तुम्ही पाहिलं असेल की ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या बोगी असतात. यामध्ये एसी कोच, स्लीपर कोच आणि जनरल कोचचा समावेश आहे.
परंतु बऱ्याच ट्रेनला किंवा त्याच्या कोचला वेगवेगळ्या रंगात देखील तुम्ही पाहिले असेल. मग तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की असं का असतं? ट्रेनचे डब्बे वेगवेगळ्या रंगाचे का असतात? यामागचं कारण काय? तर आज आम्ही तुम्हाला या रंगाचा अर्थ सांगणार आहोत.
ट्रेनमध्ये तीन रंगाचे डबे दिसतात. पहिला लाल रंगाचा, दुसरा निळा आणि तिसरा हिरव्या रंगाचा असतो. चला तर या रंगांचा अर्थ समजून घेऊया.
लाल रंगाच्या कोचचा अर्थ काय?
लाल रंगाच्या कोचला लिंक हॉफमन बुश (LHB) कोच म्हणतात. हे डबे 2000 साली जर्मनीहून भारतात आणण्यात आले होते, परंतु आता ते पंजाबमधील कपूरथला येथे बनवले जातात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अॅल्युमिनियमचे बनलेले असून ते इतर डब्यांच्या तुलनेत हलके आहेत. यासोबतच यामध्ये डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत.
या वैशिष्ट्यामुळे हे डब्बे ताशी 200 किमी वेगाने धावू शकतात. राजधानी आणि शताब्दी सारख्या जलद धावणाऱ्या ट्रेनमध्ये त्यांचा वापर केला जातो. मात्र, आता सर्व गाड्यांमध्ये एलएचबी कोच बसवण्याची योजना आहे. अशा परिस्थितीत इतर अनेक गाड्यांमध्येही त्याचा वापर सुरू झाला आहे.
निळ्या रंगाचा कोचचा अर्थ काय?
निळ्या रंगाच्या कोचला इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) म्हणतात. वास्तविक, एलबीएचच्या विपरीत, ते लोखंडाचे बनलेले असतात आणि त्यामध्ये एअर ब्रेक वापरतात. हे चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार केले जातात. पण हळूहळू आता त्याच्या जागी एलबीएचचा वापर केला जात आहे. परंतु आजही हे डब्बे मेल एक्स्प्रेस, इंटरसिटी अशा गाड्यांमध्ये आढळतात.
हिरव्या कोचचा अर्थ काय?
गरीब रथ ट्रेनमध्ये हिरवे कोच वापरले जातात. त्याचबरोबर मीटरगेज गाड्यांमध्ये तपकिरी रंगाचे डबे वापरले जातात. बिलीमोरा वाघाई पॅसेंजर ही एक नॅरोगेज ट्रेन आहे, ज्यामध्ये फिकट हिरवे डबे वापरले जातात. मात्र, यामध्ये तपकिरी रंगाचे डबेही वापरले जातात.