Fact check : भारताने बिटकॉईन स्वीकारलं?; वाचा नेमकं काय आहे सत्य!
भारताने अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारलं?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मध्यरात्री 2.11 वाजता ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, भारताने अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारलं असल्याचं म्हटलं गेलं. सरकारने अधिकृतपणे 500 BTC खरेदी केली आहेत आणि ते देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना वितरित करण्यात येणार असल्याचंही ट्विट करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकाऊंटवरून झालेलं हे ट्विट पाहताच मध्यरात्री एकच गोंधळ उडाला. मात्र प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न होता की, हे सत्य आहे की नाही.
फॅक्ट चेक
दरम्यान फॅक्ट चेक केलं असता असं समजलं की, हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत अकाऊंटवरून केलं गेलं होतं खरं. मात्र ते अधिकृतपणे पोस्ट करण्यात आलेलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं.
भारताने बिटकॉइनला मान्यता दिलेली नाही
भारताने अद्याप बिटकॉइन किंवा इतर कोणत्याही क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही. त्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान मोदीं हेच घेणार आहेत. देशातील विविध नियामक आणि तज्ञांची क्रिप्टोवर वेगवेगळी मतं आहेत. तर भारताच्या बँकिंग नियामक रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
भारतात क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे आणि भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने त्यासाठी मसुदा तयार केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाची माहिती
ट्विटर हॅक झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड करण्यात आली आहे. हे प्रकरण ट्विटरकडे नेण्यात आलं. त्यानंतर अकाऊंट सुरक्षित करण्यात आलं. खाते हॅक करताना जे काही छेडछाड केली गेली किंवा शेअर केली गेली त्याकडे दुर्लक्ष करावं."
पीएम मोदींच्या अधिकृत अकाऊंटवरून बिटकॉइनबाबत केलेलं ट्विट हॅकर्सने केलं. अकाऊंट हॅक होत असताना केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा, असं पीएमओंनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही पीएम मोदींची वैयक्तिक वेबसाइट आणि मोबाइल अॅप हॅक करण्यात आलं होतं.