Fact Check: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं असून पक्षाने सरकार स्थापनेची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या विजयानंतर राज्यभरात कार्यकर्ते आनंद साजरा करत असून ठिकठिकाणी सेलिब्रेशन सुरु आहे. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी हातात पाकिस्तानचा झेंडा (Pakistan Flag) घेऊन सेलिब्रेशन केल्याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. पण नेमकं या व्हिडीओमागील (Viral Video) सत्य काय आहे? खरंच कर्नाटकात पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला का? जाणून घ्या....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात भाजपाचं सरकार होतं. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील हे सरकार आता कोसळलं आहे. विधानसभेची मुदत 24 मे रोजी संपत असल्याने 10 मे रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. या निवडणुकीत भाजपाने सर्व 224 तर काँग्रेसने 223 आणि जनता दलाने 207 जागांवर निवडणूक लढली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी ही निवडणूक पार पडत असल्याने सर्व पक्षांसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची होती. 


शनिवारी सकाळी मतमोजणी होणार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. या निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेवर येईल असे दावा केले जात होते. तर काहीजण काँग्रेस आणि भाजपात चुरस होईल असं म्हणत होते. पण मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि ती विजयापर्यंत नेली. 



काँग्रेसने (Congress) 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या पराभवासह भाजपाला दक्षिणेतील एकमेव राज्यंही गमवावं लागलं आहे. तर काँग्रेसला 10 वर्षांनी जनतेने सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. भाजपला फक्त 65 जागांवर विजय मिळाला. त्यांनी 39 जागा गमावल्या आहेत. तर जनता दलाच्या जागा 18 ने कमी झाल्या. त्यांना फक्त 19 जागा जिंकता आल्या. 


काँग्रसेच्या विजयानंतर भाजपा नेत्यांनी आता हिंदूंचे हाल होतील अशी टीका केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमरप्रसाद रेड्डी यांनी ट्विट केलं आहे की, "कर्नाटकात आता हिंदूंचे हाल होणार आहेत. सत्तेसाठी हापापलेले काँग्रेस नेते आता कर्नाटकातील लोकशाही संपवतील आणि भ्रष्टाचार पेरतील. देशविरोधींना पाठिंबा देणारं राज्य म्हणून कर्नाटकाला ओळखलं जाईल. वाईट दिवस येत आहेत".



याचप्रकारे काही भाजपा नेत्यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट केला. यामध्ये काहीजण हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन सेलिब्रेशन करत असल्याचं दिसत आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



व्हिडीओची सत्यता काय?


पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत काही सत्यता नसल्याचं समोर आलं आहे. याचं कारण पाकिस्तानच्या झेंड्यावर पांढरा पट्टा आहे. पण व्हिडीओत दिसत असणाऱ्या या झेंड्यात पांढरा पट्टा दिसत नाही आहे. 


तरुणाने हातात घेतलेला झेंडा पाकिस्तानचा नाही. केवळ इस्लामिक संघटनाच नव्हे तर आपापल्या भागातील मशिदी जमातही स्वतंत्र झेंडे वापरतात. विशेषत: कर्नाटक आणि केरळमध्ये असे ध्वज वापरले जातात, असे सांगितले जाते. त्यामुळे अशा स्थानिक जमात किंवा संघटनेचा हा झेंडा असू शकतो.



दरम्यान यासह आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काहीजण 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहेत. या व्हिडीओची अधिकृतता अद्याप समोर आलेली नाही. पण याप्रकरणी पोलिसांनी कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.