500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
500 Rupee Note : प्रभू श्रीरामाच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतेय. 22 जानेवारीला म्हणजे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठ सोहळाच्या दिवशी ही नोट लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे.
500 Rupee Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 22 जानेवारीला प्रभू श्री रामाच्या (Lord Shree Ram) चित्रासह 500 रुपयांच्या नोटांची (500 rupee note) नवीन मालिका जारी करणार आहे? या नोटेवर प्रभू श्रीरामासह राम मंदिराचा फोटो असणार आहे? सोशल मीडियावर सध्या श्रीरामाचा फोटो असलेली पाचशे रुपयांची नोट व्हायरल होत आहे. यामुळे लोकांना खरच आरबीआय अशी नोट जारी करणार आहे का असे प्रश्न पडलेत.
महात्मा गांधींच्या जागी श्रीरामाचा फोटो?
सोशल मीडियावर भगवान श्री राम आणि अयोध्येतील राम मंदिराचा फोटो असलेली पाचशेच्या नोटेचा फोटो व्हायरल होतोय. पाचशेच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोच्या जागी श्रीरामाचा फोटो दाखवण्यात आलाय. नोटेच्या मागे जिथे लालकिल्ल्याचा फोटो आहे त्या जागेवर अयोध्येतील राम मंदिराचा झलक दाखवण्यात आली आहे. श्रीरामचा फोटो असलेली पाचशे रुपयांची ही नोट सोशल मीडियावर ट्रेंड होतेय.
व्हायरल होणारी नोट बनावट
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटांच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आणि व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्वनी राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी कोणतीही घोषणा केली गेलेली नाही किंवा आरबीआयने कोणतीही माहिती दिली नाही. ही खोटी बातमी असल्याचं अश्वनी राणा यांनी सांगितलं. आरबीआय 500 रुपयांच्या नव्या सीरिजच्या नोटा जारी करणार नाही.
आरबीआयने केला इन्कार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी इतर चित्रांसह 500 रुपयांच्या नव्या नोटांची मालिका जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून 2022 मध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रांसह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत आहे अशी बातमी व्हायरल झाली होती. त्यानंतर या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पत्रकार परिषद घ्यावी लागली. असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
आताही श्रीरामाचा फोटो असलेली पाचशे रुपयांच्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असून हे वृत्त चुकीचं असल्याचं आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलं आहे. अशा प्रकारची कोणतीही नोट आणण्याचा विचार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.