बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा (Ramlala Pran Pratishtha) केली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येत (Ayodhya) आजपासून सात दिवसांचा उपवास सुरु करण्यात आला आहे. सोहळ्याची संपूर्ण तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व देशवासियांना रामलल्ला प्राण प्रतिष्ठेच्या मुहूर्तावर देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. यानिमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढली जाणार आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
या दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून एक मोठा दावा करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या बातमीत राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी बाबरी मशिदीच्या (Babri Mosque) जागेपासून तीन किलोमीटर दूरीवर करण्यात आल्याचं म्हटलं आहे. गुगलवर राम मंदिराचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात राम मंदिर आणि बाबरी मशीदीच्या दोन वेगवेगळ्या जागा दाखवण्यात आल्या आहेत.
संजय राऊत यांनीही केला दावा
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राम मंदिर बाबरी मशिदीच्या दोन वेगवेगळया जागा असल्याचं म्हटलं आहे. राम मंदिर तीन किलोमीटर दूर बनवायंच होतं तर मशीद का पाडण्यात आली? हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद का निर्माण केला? असा सवालही संजय राऊत यांनी केलाय.
फोटोमागचं सत्य काय?
व्हायरल होणाऱ्या फोटोत राम मंदिराची उभारणी बाबरी मशीदीपासून तीन किलोमीटर दूरवर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पण ऑल्ट न्यूजने या दाव्याची पडताळणी केली असता व्हायरल होणारा फोटो बनवाट असल्याचं समोर आलं. वास्तविक ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडण्यात आलं होतं, त्याच जागेवर राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. बाबरी मशीदीपासून राममंदिर तीन किमी दूर असल्याचा दावा खोटा आहे.