Fact Check | इन्कम टॅक्सची लकी ड्रॉ स्कीम करेल मालमाल?
तुम्हाला जर लकी ड्रॉ लागल्याचा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा. इन्कम टॅक्सने लकी ड्रॉ सुरू केला असून, जिंकणाऱ्याला हजारोचं बक्षीस मिळतं असा मेसेज व्हायरल होतोय.
मुंबई : तुम्हाला जर लकी ड्रॉ लागल्याचा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा. इन्कम टॅक्सने लकी ड्रॉ सुरू केला असून, जिंकणाऱ्याला हजारोचं बक्षीस मिळतं असा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली चला पाहुयात. (fact check viral polkhol income tax lucky draw scheme know what true what false)
दावा आहे की इन्कम टॅक्स विभागाने लकी ड्रॉ स्कीम सुरू केली आहे. या स्कीममधून ज्या व्यक्तीचं नाव येतं त्याला हजारो रुपये मिळतात असा दावा करण्यात आला आहे. एका व्यक्तीला असे पैसे मिळाल्याचा दावा करून मेसेज व्हायरल केला जातोय. पण, खरंच अशी कोणती स्कीम आहे का, हे पाहण्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
व्हायरल मेसेजमध्ये काय?
इन्कम टॅक्स विभागाने कौन बनेगा करोडपती सोबत मिळून लकी ड्रॉ स्कीम सुरू केलीय. जिंकणा-याला हजारोंचं भरघोस बक्षीस मिळतं. हा दावा केल्यानं आम्ही या व्हायरल दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. खरंच अशी कोणती स्कीम इन्कम टॅक्स विभागाने सुरू केलीय का? याची आम्ही पडताळणी केली
त्यावेळी आमच्या पडताळणीत अशी कोणतीही स्कीम नसल्याचं स्पष्ट झालं...मग हे मेसेज कोण पाठवतंय...? पाहुयात व्हायरल पोलखोल.
व्हायरल पोलखोल
लकी ड्रॉच्या नावाखाली हा एक घोटाळा आहे. इन्कम टॅक्सची अशी कोणतीही लकी ड्रॉ स्कीम नाही. लोकांची फसवणूक करण्यासाठी मेसेज, इ मेल केले जातायत. मेसेजला रिप्लाय केल्यास तुमच्याकडेच पैसे मागितले जातात. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नका.
घोटाळेबाजांनी पाठवलेल्या मेसेजला रिप्लाय दिल्यास ही टोळी तुमच्याकडून पैसे मागून खातं खाली करते. आपण जर लकी ड्रॉसाठी अर्जंच केलं नसेल तर लॉटरी लागेलच कशी हादेखील प्रश्न असतो.
पण, काहीजण पैशांच्या आमिषाला बळी पडून यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे कोणतेही असे मेसेज आल्यास तर रिप्लाय करू नका. आमच्या पडताळणीत इन्कम टॅक्स विभागाने लकी ड्रॉ स्कीम सुरू केल्याचा दावा असत्य ठरला.