महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कॉंग्रेस स्वबळावर
GOA ELECTION 2022 : का दिला काँग्रेसने नकार?
पणजी : महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार बनवणारे राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (ShivSena) गोवा विधानसभा निवडणूक रिंगणात एकत्रित उतरणार आहेत. मात्र, या निवडणुकीत त्यांच्यासोबत जाण्यास काँग्रेसने नकार दिला आहे.
गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
गोव्यात राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. वास्तविक, गोव्यामध्ये महाराष्ट्र युतीचा प्रयोग करण्याचा विचार होता. परंतु, काँग्रेसशी चर्चा करून काहीही निष्पन्न झाले नाही. 'गोव्यात स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो, असं काँग्रेसचं (Congress) म्हणणं आहे. त्यामुळे काँग्रेसने नकार दिला आणि गोव्यात 'महाविकास आघाडी'चा प्रयत्न फेल गेला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये जागावाटपाबाबत काल चर्चा झाली. राष्ट्रवादी पक्ष गोव्यात 10 ते 12 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यातील राजकीय परिस्थिती लक्षा घेता काँग्रेसने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली तर ते युनिटचा आकडाही पार करू शकणार नाही, असे सांगत काँग्रेसच्या या निर्णयाची खिल्ली उडविली. तर, प्रफुल्ल पटेल यांनी कॉंग्रेसला एकही जागा मिळवता येणार नाही, असे म्हटले आहे.
2017 मध्ये कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?
2017 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 36 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी काँग्रेसने 17 तर भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. गोवा फॉरवर्ड पार्टीने (GFP) चार जागांवर निवडणूक लढवून त्यातील तीन जागा जिंकल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने 34 जागा लढवल्या, मात्र त्यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर, 3 जागा अपक्ष उमेदवारांच्या आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली होती.