दिल्लीत इमारतीवरून पडून कोल्हापूरातील शेतकऱ्याचा मृत्यू
आज सकाळी आंबेडकर भवनात हा प्रकार घडला.
नवी दिल्ली: दिल्लीच्या पहाडगंज परिसरातील आंबेडकर भवनाच्या इमारतीवरून पडून महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आंबेडकर भवनात हा प्रकार घडला. मृत शेतकऱ्याचे नाव किरण संत (५२) असून ते कोल्हापूरचे रहिवाशी आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार किरण संताप आंबेडकर भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. मात्र, ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याबद्दल अजून कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांनी दिली.
दिल्लीत शुक्रवारी देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले होते. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले करण संत (वय ४५) हे देखील मोर्चासाठी दिल्लीत गेले होते. ‘किसान मुक्ती मोर्चा’ने आयोजित केलेल्या या मोर्चाला देशभरातून लाखो शेतकरी जमले होते. या मोर्चाला देशातील २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन संसद मार्गावर जनसंसद भरवली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, समाजवादी नेते धर्मेंद्र यादव, तृणमूलचे नेते दिनेश त्रिवेदी, जेडीयू नेते शरद यादव, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांनी या किसान संसदेला हजेरी लावत मोदी सरकारवर टीका केली होती.