शेतकरी आक्रमक! शंभू सीमेवर `आर या पार`ची लढाई लढण्याच्या तयारीत, केंद्राकडून पुन्हा चर्चेसाठी बोलावणं
Farmer Protest: हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर उपस्थित शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वेतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांकडून आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा करण्यात आला आहे.
Farmer Protest: दिल्लीच्या सीमेर गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेले शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सुरक्षा दल आणि पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनच्या आधारे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या डागल्या आहेत. पोलिसांकडून अश्रूधुराचा हल्ला करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली होती.
पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी किमान आधारभूत किंमतीला (MSP) पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने 2020/21 च्या हिंसक निदर्शनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चर्चेची पाचवी फेरी बोलावली आहे.
शेतकऱ्यांवर बळाचा वापर
शेतकऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यानुसार शेतकरी आज सीमेवरुन पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला.
जवळपास 14 हजार शेतकरी 12 हजार ट्रॅक्टरसह दिल्लीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या तयारीत आहेत. पण पोलिसांना 2021 मध्ये झालेल्या चुकीची पुनरावृत्ती टाळायची आहे. मागील आंदोलनापासून धडा घेत पोलिसांनी यावेळी सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षा दलाला तैनात केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे.
दरम्यान शेतकरी सीमेवर पोकलेन आणि जेसीबीसह मोठ्या मशीन्स घेऊन दाखल झाले आहेत. दुसरीकडे हरियाणा पोलिसांनी माती काढणाऱ्या मशीन्स आंदोलनस्थळावरुन हटवल्या नाहीत तर त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दिल्लीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी
राजधानीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. यानंतर दिल्ली-गुरुग्राम, दिल्ली-बहादूरगढ आणि अनेक रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने शेतकरी नेत्यांशी चौथ्या फेरीतील चर्चा करण्यासाठी रविवारी प्रस्ताव दिला होता. शेतकऱ्यांशी करार केल्यानंतर सरकारी संस्था पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस एमएसपीवर खरेदी करतील, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही असं सांगत शेतकरी नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळला होता.
केंद्राकडून पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रण
कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे. चौथ्या फेरीनंतर सरकार एमएसपीसह (किमान आधारभूत किंमत) सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. मी सर्व शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो असं ते म्हणाले आहेत. अनियमित घटक चर्चा हायजॅक करू पाहत आहेत असा आरोप करताना त्यांनीशेतकऱ्यांनी शांततापूर्ण निषेध होईल याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
1. MSP ची कायदेशीर हमी.
2. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे.
3. शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन.
4. कृषी कर्जमाफी.
5. विजेच्या दरात वाढ करु नये
6. 2021 च्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय
7. भूसंपादन कायदा, 2013 ची पुनर्स्थापना
8. 2020-21 मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई.