श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी तुटतील पण हिंदुस्तान कधीच तुटणार नाही, असे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले. ते सोमवारी श्रीनगर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर आव्हान देतो की, एकवेळ तुम्ही मोडून पडाल पण हिंदुस्तान कधीच तुटणार नाही. अब्दुल्ला घराण्याला काश्मीर भारतापासून तोडायचा आहे, असे मोदी म्हणतात. मात्र, जर आम्हाला तसे करायचेच असते तर आज हिंदुस्तान शिल्लकच राहिला नसता, असे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते. काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना आणून वसवण्याचा विचार काहीजण करत आहेत. जेणेकरून आमची लोकसंख्या कमी होईल, असे त्यांना वाटते. हे सर्व सुरु होताना आम्ही काय झोपून राहणार का? आम्ही याचा मुकाबला नक्की करू. ३७० कलम रद्द केले तर अल्लाह कुठे राहणार? कदाचित अल्लाहचीच इच्छा असेल की आम्ही त्यांच्यापासून स्वतंत्र व्हावे. आम्ही पण बघतोच तुम्ही काश्मीरमधील कलम ३७० कसे रद्द करता? मग तुमचा झेंडा फडकावयला कोण तयार होते, हे मी बघतोच, असे त्यांनी म्हटले होते. यावरून बराच गदारोळही माजला होता. 



यानंतर नुकत्याच कथुआ येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला आणि मुफ्ती घराण्यावर टीकास्त्र सोडले होते. अब्दुल्ला आणि मुफ्ती दोघांनी जम्मू-काश्मीरच्या तीन पिढया उद्धवस्त केल्या. मी अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना देशाचे विभाजन करु देणार नाही. ना मी कोणासमोर झुकत, ना कोणी मला विकत घेऊ शकत नाही, असे मोदींनी सांगितले होते.