नवी दिल्ली : अनुच्छेद ३७० संबंधित घडामोडींदरम्यान गायब असलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आज जनतेसमोर आले. संसदेत त्यांच्यासंबंधी समोर आलेल्या प्रश्नांदरम्यान अब्दुल्ला श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना दिसले. यावेळी त्यांनी आपल्यालाही केंद्र सरकारनं नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला. 'मला माझ्या घरातून बाहेर पडण्यास मनाई केली गेली. रुग्णालयातही जाऊ दिलं नाही. परंतु, जेव्हा गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मी कैदेत नसल्याचं सांगितलं तेव्हा मी बाहेर आलो. मी देशाला सांगू इच्छितो की मला माझ्याच घरात बंद करण्यात आलं होतं. मी घरातून बाहेर पडू शकत नव्हतो, कुठेही जाऊ शकत नव्हतो' असं यावेळी त्यांनी म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जसे दरवाजे उघडतील तसे आम्ही बाहेर येईल... आम्ही न्यायालयात जाऊ... आम्ही बंदूक हातात घेतलेली नाही ना आम्ही ग्रेनेड फेकणारे आहोत... त्यांना आमची हत्या करायची आहे. माझा मुलगा तुरुंगात आहे' असं म्हणत अब्दुल्ला यांनी जनतेला साद घातली.


जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक असंविधानिक असल्याचं म्हटलंय. प्रत्येक मुद्यावर आम्हाला शांतीनंच उत्तर हवंय... या विधेयका विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी म्हटलंय.


'गृहमंत्री खोटं बोलतील याची अपेक्षा मला नव्हती. माझं राज्य जळत असताना आणि माझ्या माणसांना तुरुंगात टाकलं जात असताना मी माझ्या मर्जीनं घरात कसा राहू शकेन... हा तो भारत नाही ज्याच्यावर माझा विश्वास होता' असं म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका केलीय. 



अब्दुल्ला जनतेसमोर येण्याअगोदर काही वेळ अगोदर दोन दिवसांपासून कुठेही न दिसलेल्या फारुख अब्दुल्ला यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न विचारला होता. 'माझ्या बाजुला फारुख अब्दुल्ला संसदेत बसतात आणि ते जम्मू-काश्मीरमधून निवडून आलेत. पण आज मात्र त्यांचा आवाज कुठेही ऐकू येत नाहीय. त्यांच्याशिवाय ही चर्चा अपूर्ण आहे' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अब्दुल्ला गायब असण्याविषयी संसदेत मुद्दा उपस्थित केला होता. यावर, 'फारुख अब्दुल्ला यांना ना अटक करण्यात आलीय, ना अटक करण्यात आलीय. ते आपल्या मर्जीनं घरी आहेत' असं अमित शाह यांनी संसदेत म्हटलं. यावर सुळे यांनी 'त्यांची तब्येत ठिक नाही का?' असं विचारल्यावर 'मी त्यांची तब्येत सुधारू शकत नाही. ते डॉक्टरांचं काम आहे' असं अमित शाह यांनी प्रत्यूत्तर दिलं.