लोकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं उभारण्यात आलं आहे. रस्ते मंत्रालयाकडून देशातील एक्स्प्रेस-वे आणि हायवेंचं हे जाळं आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ही सुविधा घेताना त्याचे पैसेही आपल्याला मोजावे लागतात. हायवे उभारण्यासाठी आलेला खर्च टोलच्या माध्यमातून वसूल केला जातो. आणि याचसाठी हायवेंवर टोलनाके उभारण्यात आलं आहे. पण या टोलनाक्यावर वाहन चालकाकडून अतिरिक्त पैसे आकारणं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला (NHAI) चांगलंच महागात पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुत एका व्यक्तीने टोलनाक्यावर 10 रुपये अतिरिक्त घेतल्याने NHAI ला ग्राहक न्यायालयात खेचलं. इतकंच नाही तर त्याने 10 रुपये अतिरिक्त घेतल्याच्या मोबदल्यात NHAI ला 8000 ची नुकसानभरपाई द्यायला लावली. 


मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुच्या गांधीनगरमध्ये राहणाऱ्या संतोष कुमार एमबी यांनी 2020 मध्ये चित्रदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावरुन दोन वेळा प्रवास केला. यावेळी टोलनाक्यावर दोन्ही वेळा त्यांच्या खात्यातून 5 रुपये म्हणजेच एकूण 10 रुपये अतिरिक्त कापून घेण्यात आले. संतोष यांच्या माहितीनुसार, त्याच्या फास्टटॅग (FASTag) खात्यातून 35 ऐवजी 40 रुपये कापून घेण्यात आले. 


तसं पाहायला गेल्यास 10 रुपये ही फार मोठी रक्कम नाही. पण टोलनाक्यावर रोज हजारो, लाखो गाड्या जातात. जर त्या हिशोबाने ही रक्कम पाहिली तर एखाद्या मोठ्या घोटाळ्याइतकी असू शकते. 


संतोष कुमार यांनी याप्रकरणी शहरातील प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. इतकंच नाही तर त्यांनी इतर संस्था आणि अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. पण कोणीही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी ग्राहक कोर्टात धाव घेतली आणि NHAI ला कायदेशीर हिसका दाखवला. 


संतोष कुमार यांनी सर्वात प्रथम NHAI प्रकल्प संचालक आणि नागपूर येथील जेएएस टोल रोड कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकावर खटला दाखल केला. त्यानंतर, NHAI च्या प्रकल्प संचालकाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितलं की, FAStag प्रणालीचं डिझाइन, डेव्हलप आणि कॉन्फिगर करण्याच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केली आहे.


पण प्राधिकरणाकडून करण्यात आलेले सर्व युक्तिवाद कोर्टाने फेटाळून लावले. कोर्टाने NHAI ला अतिरिक्त टोल परत करण्याचा तसंच 8000 रुपयांची नुकसान भरपाईचा आदेश दिला. अशाप्रकारे संतोष कुमार यांना 10 रुपयांच्या मोबदल्यात 8000 रुपयांचा मोबदला मिळवला आहे.