मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात वाहनांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे स्वत:चे वाहन असणं कायम सोयीस्कर ठरते. परंतु गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळले जाणेही तितकेच गरजेचे असते. अनेकदा या नियमांचं उल्लंघन होतं,  त्यामुळे देशभरात वहतुकीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. दुचाकी चालकांसाठी सरकारने हेल्मेट घालणं सक्तीचं केलं आहे. पण, या नियमांचीही वारंवार पायमल्ली होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नियम वारंवार धुडकावले गेले तरीही एका वडिलांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ सर्वसामान्यांना चांगल्या सवयीं लावण्याचा निर्धार केला आहे. गुजरातमधील पोरबंदर शहरातील माजी महानगरपालिका सचिव अतुलभाई करिया यांच्या मुलाचा रोड अपघातात मृत्यू झाला होता. प्रणव असे त्यांच्या मुलाचे नाव. दुचाकीवरून प्रवास करत असताना एका भरधाव कारसोबत झालेल्या अपघातात त्याने प्राण गमावले. त्या क्षणी त्याने हेल्मेट घातले असते तर कदाचीत त्याचे प्राण वाचलेही असते.


याच पार्श्वभूमीवर अतुलभाई करिया यांनी आपल्या मुलाला श्रद्धांजली देत हेल्मेट सर्कल म्हणजेच हेल्मेट चौक बनवले आहे. ज्या निमित्ताने ते वाहतूक नियमांबद्दल जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांसाठी हा एक उत्तम दाखला असल्याचे येथे स्पष्ट होत आहे.