अधिकाऱ्याने लग्नातल्या गर्दीचा व्हीडिओ काढला, वधुपित्याने जीव सोडला
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. सरकारने लग्न संमारंभासाठी 25 जणांना उपस्थित राहण्याचीच परवानगी आहे.
जयपूर : देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शासनाने विवाह सोहळा आणि अंत्यविधीसाठीही फक्त 25 जणांनाच परवानगी दिली आहे. मात्र जयपूरमध्ये विवाहसोहळ्यात कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं सांगत प्रशासनाने वधूपित्यावर दंडात्मक कारवाई केली. प्रशासनाच्या या दंडात्मक कारवाईने वधूपित्याचा जीव गेला आहे. बृजमोहन मीणा असं मृत वधूपित्याचं नाव आहे. ते जयपूरमधील बुंदी जिल्ह्यातील अडीला गावातील रहिवाशी होते. (Father dies after paying Rs 1 lakh fine for violating corona rules at daughter's wedding in Jaipur)
नक्की काय झालं?
बृजमोहन यांच्या धाकट्या मुलीचं लग्न 14 मे रोजी पार पडलं. अधिकाऱ्यांनुसार, विवाह सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. लग्न मंडपात मर्यादेपेक्षा अधिक वऱ्हाडी आणि नातेवाईक होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
बृजमोहन यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यात 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. बृजमोहन यांच्यावर दंड भरण्यासाठी दबाव आणला गेला. त्यामुळे त्यांनी हा दंड भरण्यासाठी शेतजमीन गहाण ठेवली. बृजमोहन यांनी 17 मे ला दंडाची रक्कम भरली. मात्र यानंतर मोजून 3 दिवसांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
कुटुंबियाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
घडल्या प्रकाराबाबत बृजमोहन यांच्या पत्नीने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी आपली बाजू मांडली आहे. विवाह सोहळ्यात नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं यात म्हटलं.
निवेदनात काय म्हटलंय?
माझ्या मुलीचा विवाहसोहळा प्रशासनाच्या नियमांनुसारच पार पडला. लग्नात आम्ही कुठल्याही प्रकारने नियमांच उल्लंघन केलं नाही. मंडपात आमचे 7 नातेवाईक जेवत होते. यावेळेस अधिकारी लग्न मंडपात आले. अधिकाऱ्यांची फौज लग्न मंडपात आल्याने नक्की काय झालंय, हे जाणून घेण्यासाठी गावकरी मंडपात जमले. यामुळे मंडपात गर्दी झाली. जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काढला. गर्दी झाल्याने तुम्हाला दंड भरावा लागेल, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तसेच गुन्हा दाखल करण्याचीही धमकी देण्यात आली. त्यांची प्रकृती फार ठीक नव्हती. त्यात अधिकाऱ्यांच्या धमकीचा त्यांनी धसका घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितलेली दंडात्मक रक्कम ही माझ्या पतीने शेतजमीन गहाण ठेवून 17 मे ला भरली. मात्र, त्यांचं 20 मे ला निधन झालं, असं या निवेदनात म्हटलं आहे.
"आर्थिक मदत करावी"
दरम्यान यामुळे आमच्या घरातील कर्ता व्यक्ती आमच्यातून निघून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणीही बृजमोहन यांच्या पत्तीने निवेदतनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.