राजस्थानच्या (Rajasthan) भिलवाडा (Bhilwada) येथे एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर कोळशाच्या भट्टीत जाळून तिला ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोळशाच्या भट्टीत मुलीचे जळालेले अवशेष सापडले होते. दरम्यान, मुलीवर अंत्यसंस्कार केले जात असताना तिच्या वडिलांनी चितेवर उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडित मुलीचे वडील जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर 2 ऑगस्टला कोळशाच्या भट्टीत तिचे काही अवशेष सापडले होते. यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंत्यसंस्कार करताना अग्नी देताच मुलीच्या वडिलांनी तिच्या चितेवर उडी मारत आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांना अडवलं. मात्र ते जखमी झाले असून, रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महात्मा गांधी रुग्णालयातील डॉक्टर अरुण गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या सामान्य आहे. 


सामुहिक अत्याचारानंतर कोळसा भट्टीत जाळलं, अल्पवयीन मुलीच्या हत्येत आरोपींच्या पत्नींचाही समावेश


दरम्यान या गुन्ह्याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली भिलवाडा येथील कोटरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (एएसआय) निलंबित करण्यात आलं आहे.


नेमकं प्रकरण काय?


राजस्थानच्या भिलवाडात (Bhilwara) सर्वांना हादरवणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर कोणताही पुरावा सापडू नये यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह जंगलातील कोळसा भट्टीत (Coal Furnace) जाळला. 


आरोपींच्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. चारपैकी दोघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर वार करत तिला बेशुद्ध केलं. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मुलीला कोळसा भट्टीत जिवंत जाळलं. जळालेल्या मृतदेहाचे काही तुकडे त्यांनी जवळच्या तलावात फेकून दिले होते. पोलिसांना कोळसा भट्टीत मुलीच्या बांगड्या आणि काही हाडं सापडली आहेत. तसंच 4 ऑगस्टला तलावातून शरिराचे अर्धवट जळालेले भाग सापडले आहेत. 


अल्पवयीन मुलगी (Minor Girl) आपल्या आईबरोबर जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. दुपारी आई घरची कामं असल्याने घरी परतली. पीडित मुलगी एकटीच जंगलात होती. दुपारच्या वेळेस कोळसा भट्टीत काम करणाऱ्या 21 वर्षांच्या कान्हा आणि 25 वर्षांच्या कालू या दोघांनी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर वार करत तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर त्यांनी मुलीला पेटत्या कोळसा भट्टीत टाकून दिलं आणि तिथून निघून गेले. रात्री ते पु्न्हा कोळसा भट्टीजवळ आले. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे ते घाबरले आणि मृतदेहाचे तुकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ते जवळच्या तलावात फेकून दिले. 


दरम्यान दुसरीकडे रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी आणि गावातील लोकांना तिचा शोध सुरु केला होता. शोध घेत असताना जंगलातील एका कोळसा भट्टीच्या बाहेर मुलीची चप्पल पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी भट्टीतली लाकडं बाजूला केली असता जळालेल्या अवस्थेत मुलीची हाडं सापडली. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या पत्नीनींही त्यांना मदत केली.


भिलवाडाचे एसपी आदर्श सिद्धू यांनी हे “दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण” आहे असं सांगत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं आहे. “आम्ही जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. दुर्मिळ गुन्ह्यांपैकी हा सर्वात दुर्मिळ आहे,” असं एसपी म्हणाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात 10 आरोपी सहभागी होते. यामधील सहा पुरुष आणि चार महिला आहेत.