मुंबई : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील एका सुतारकाम आणि मजुरी करणाऱ्या व्यक्तीला Corona कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केरळमधून काढता पाय घ्यावा लागला. कोरोनाच्या भीतीमुळे त्याने पळ काढला आणि थेट गाव गाठलं. त्यावेळी त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती की नशिबाने आपल्यासाठी नेमकं पुढे काय वाढून ठेवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातावर पोट असणाऱ्या ३० वर्षीय इजारुल शेख याने आपल्या मुळ गावी परतल्यानंतर एक कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आणि नशिबाची ही खेळी पाहून सारेच अवाक् झाले. मिर्जापूर गावातील इजारुल शेख केरळमध्ये काम करतो. पण, जेव्हा केरळमध्ये कोरोना अर्थात कोविड १९चा प्रादुर्भाव वाढत असल्याचं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने लगेचच आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. 


इजारुल याचं घर हे मिर्जापूर येथील बेलदंगामधील पोलीस स्थानकाजवळच आहे. रविवारी एका पोलीस अधिकाऱ्यानेच इजारुल शेखने लॉटरी जिंकल्याची माहिती दिली. आई- वडील, पत्नी आणि मुलगी असं इजारुलचं कुटुंब आहे. बुधवारी त्याने एक कोटींची बक्षिसपात्र रक्कम असणारं लॉटरीचं तिकीट खरेदी केली. दुसऱ्याच दिवशी त्याला ही अविश्वसनीय रकमेची लॉटरी लागली. 


आपल्याला लॉटरीचं बक्षिस जाहीर झाल्याचं कळतात इजारुल शेखने पोलीस स्थानकात जात त्यांच्याकडून मदत मागितली. अनेकांनाच त्याला लॉटरीचं बक्षीस जाहीर झाल्याची माहिती मिळाली आणि लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हे सारंकाही त्याच्यासाठी नवं होतं. 



वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला


पोलीस आणि काही आप्तेष्टांच्या सांगण्यावरुन इजारुलने ही सर्व रक्कम बँकेत जमा केली. येत्या काळात आपल्या कुटुंबासाठी एक घर उभं करुन नवा व्यवसाय सुरु करण्याचा मानस असल्याचं त्याने स्पष्ट केलं. केरळमध्ये आलो होतो तेव्हा भविष्याचीच चिंता लागली होती. दिवसाला मजुरीच्या स्वरुपात अवघे ५०० ते ६०० रुपये कमवणाऱ्या मला आज ही लॉटरी मिळाल्यामुळे माझ्या अनेक अडचणी दूर होतील अशी आनंदाची भावना त्याने व्यक्त केली.