Woman paraded naked in Bengal: मणिपूरमधील (Manipur) घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. मणिपूरमध्ये जमावाने महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. इतकंच नाही तर महिलेची हत्या कऱण्याआधी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात असून, चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, मणिपूरवरुन संताप व्यक्त होत असतानाच पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) अशीच घटना घडली आहे. बंगालमध्ये महिलेसह हिंसाचार करत निर्वस्त्र फिरवण्यात आलं. हावडा (Howrah) येथील पांचलामधील पंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराने तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शारिरीक छळ केल्याचा आरोप केला आहे. 


8 जुलैची घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना 8 जुलैची आहे. त्या दिवशी राज्यात पंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. महिला उमेदवाराने आरोप केला आहे की, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तिला निर्वस्त्र करत संपूर्ण गावात फिरवलं. हावडा जिल्ह्याच्या पांचला परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पांचला पोसी, ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर आरोप


महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं आहे की, मला तृणमूलच्या जवळपास 40 जणांनी मारहाण केली. माझ्या छाती आणि डोक्यावर काठीने मारहाण केली आणि मतदान केंद्राच्या बाहेर फेकून दिलं. महिलेने तक्रारीत तृणमूलचे उमेदवार हेमंत राय, नूर आलम, अल्फी एसके, रणबीर पांजा संजू, सुकमल पांजा यांच्यासह अनेकांची नावं दिली आहेत. 


कपडे फाडून छेडछाड


माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर मला नग्न होण्यास भाग पाडलं. सर्वांनी माझ्यासह छेडछाड केली. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला असा महिलेचा आरोप आहे. 


बंगाल भाजपाचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी यावरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाण साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "ममता बॅनर्जी यांना काहीच लाज वाटत नाही? तुमच्या राज्य सचिवालयापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. तुम्ही एक अपयशी मुख्यमंत्री आहात. तुम्ही तुमच्या बंगालवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे," असं ते म्हणाले आहेत.


मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हिंसाचार उफळलेल्या मणिपूरमधील दोन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. 4 मे रोजी घडलेल्या या घटनेत जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचं दिसत आहे. जमावाने यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसंच मध्यस्थी करणाऱ्या तिच्या भावाची हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेते यावर व्यक्त होत आहेत. सुप्रीम कोर्टानेही या घटनेची दखल घेतली आहे.