Fight in Indian Wedding: भारतीय लग्न समारंभ (Indian Wedding) म्हणजे गोंधळ, रुसवे-फुगवे हे जणू काही समीकरणच झालं आहे. भारतीय लग्नांमध्ये अनेक गोष्टी या आवर्जून केल्या जातात. अगदी प्रथा, परंपरा जपण्यापासून ते पाहुणचारपर्यंत अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. त्यातही वर आणि वधूच्या बाजूने एकमेकांचा मानपान हा ही मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडून मानपानामध्ये काही कमी पडायला नको असा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातो. या सर्वांमध्ये दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ मंडळींचा सल्ला हमखास घेतला जातो. त्यात अगदी जेवणापासून ते डेकोरेशनपर्यंतच्या अनेक गोष्टी असतात. मात्र एवढं करुनही लग्न कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडेल याची गॅरंटी नसते. उत्तर प्रदेशमध्ये असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडला.


पुरुषांकडून हाणामारी अन् महिलांचे अयशस्वी प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील एका लग्नामध्ये अचानक वरपक्ष आणि वधूपक्षातील पाहुणे मंडळी एकमेकांना हाणामारी करु लागली. बरं हा सारा प्रकार घडला कशावरुन तर नवऱ्या मुलाच्या आत्याच्या पतीला जेवणामध्ये पनीर मिळालं नाही यावरुन. आधी बाचाबाचीवरुन सुरु झालेलं हे प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. आयएम आदी योगी नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन लग्नातील या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आणि हा प्रकार जगासमोर आला. या व्हिडीओमध्ये दोन्ही बाजूचे वऱ्हाडी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये महिला हाणामारी करणाऱ्या पुरुषांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र या महिलांना पुरुषांना थांबवण्यात फारसं यश येताना दिसत नाही. काही पुरुष मंडळीही या हाणामारी करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते सुद्धा यात अपयशी ठरतात.


कॅप्शनही चर्चेत...


"शादी में दूल्हे के फूफा को पनीर न परोसने का अंजाम देखलो," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा सारा प्रकार उत्तर प्रदेशमधील बागपत येथे घडल्याचा दावा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या आदित्य भारद्वाज यांनी केला आहे. 



काकांनी घरी जाऊन पनीर खायला पाहिजे होतं


या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने जाणीवपूर्वकपणे हे घडवून आणल्याचा दावा केला आहे. तर अन्य एकाने 'उत्तर प्रदेश हा आपलं अशापद्धतीने मनोरंजन करण्यात कधीच मागे नसतो', असा टोमणा मारला आहे. अन्य एकाने 'जे घडलं ते फार वाईट आहे. एवढंच पनीर खायची इच्छा होती तर या काकांनी घरी ती पूर्ण करायला हवी होती', अशा शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे.