आधारचा डेटा विकता येतो, अशी बातमी केल्याने पत्रकारावर गुन्हा
गंभीर दखल घेता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पैसे घेऊन आधार कार्डचा डेटा विकला जात असल्याचं वृत्त देणाऱ्या वृत्तपत्रावर आणि पत्रकारावर, आधार प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआयने तक्रार दिली आहे. त्याची गंभीर दखल घेता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिल्लीच्या पोलीस सहआयुक्तांनी 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एफआयआर दाखल झाल्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.एफआयआरमध्ये रिपोर्टर रचना खैरा आणि त्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला त्यांचंही नाव आहे.
काय आहे प्रकरण?
बायोमेट्रिक डेटा मिळवणं कुणासाठीही शक्य नाही, असं आधार प्राधिकरणाने म्हटलं होतं. याबाबत एक पत्रही ट्रिब्युनला पाठवण्यात आलं. रिपोर्टरने कुणाच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे रेकॉर्ड पाहिले का? पत्रकाराने किती आधार क्रमांकाची पडताळणी केली आणि ते आधार नंबर कुणाचे होते? असा सवाल आधार प्राधिकरणाने ट्रिब्युनला विचारला आहे.
प्रश्नांची उत्तरं 8 जानेवारीपर्यंत देण्याची मागणी
या प्रश्नांची उत्तरं 8 जानेवारीपर्यंत न दिल्यास हे वृत्त निराधार होतं, असं ग्रहित धरण्यात येईल, असं आधार प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे.
बातमीत काय म्हटलं होतं पाहा?
केवळ 500 रुपये मोजल्यास कोणाच्याही आधार क्रमांकावरील गोपनीय माहिती मिळते, असं वृत्त रचना यांनी दिलं होतं. त्याचबरोबर अधिकचे 300 रुपये दिल्यास आधार कार्ड प्रिंटिंगचे सॉफ्टवेअरही मिळतात, असं या बातमीत म्हटलं होतं.
आधार प्राधिकरणाने दावा फेटाळला
या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. त्यानंतर आधार प्राधिकरणाने तातडीने निवेदन प्रसिद्ध करत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर यासंदर्भातील बातमीप्रकरणी रचना खैरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.