चेन्नई - आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तमिळ चित्रपटसृ्ष्टीतील एका सहायक दिग्दर्शकाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. तिची ओळख पटू नये म्हणून त्याने तिच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून ते वेगवेगळ्या कचऱ्याच्या बॅगेत भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पण हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. अखेर बुधवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. गोपालकृष्णन असे त्याचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालकृष्णन आणि त्याची पत्नी संध्या यांच्यामध्ये वाद झाला. पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गोपालकृष्णन याला होता. त्यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. वादामध्ये दोघांनी एकमेकांना मारहाणही केली. हाणामारीत डोक्याला जबर जखम झाल्याने त्याची पत्नी संध्या घरातच मृत पावली. यानंतर गोपालकृष्णन याने तिची ओळख पटू नये, म्हणून तिच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या कचऱ्याच्या बॅगेत भरले. या सर्व बॅगा त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्या. मृत महिलेचे दोन पाय आणि हात पोलिसांनी पेरुंगुडीमधून जप्त केले आहेत. बुधवारी पोलिसांनी गोपालकृष्णन याला जाफेरखानपेठमधील त्याच्या निवासस्थानातून अटक केली. पोलीस चौकशीमध्ये त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे कबुल केले. 


सन २०१० मध्ये गोपालकृष्णन आणि त्याची पत्नी संध्या यांनी एका तमिळ चित्रपटाची निर्मिती केली होती. संध्या हिनेच चित्रपटासाठी पैसे उभे केले होते. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला नाही. त्यामुळे गोपालकृष्णन याने आपल्या एका मित्राच्या निर्मिती संस्थेमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गोपालकृष्णन आणि संध्या यांच्यात वरचेवर भांडणे होत होती. दोघांनीही घटस्फोटासाठी अर्जही केला होता.