सोनिया गांधी यांच्या विरोधात FIR, पीएम केअर्स फंडबाबत काँग्रेसचे ट्विट
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिवमोगा येथील सागर शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरु : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिवमोगा येथील सागर शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात एका स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान केअर फंड याबाबत काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आले होते. पंतप्रधान फंडवर आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. देशात एकीकडे कोरोना संकटाशी लढाई सुरु असताना दुसरीकडे, कॉंग्रेस-भाजपमध्ये राजकीय संघर्षही सुरु असल्याचे दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान, या राजकीय संघर्षात आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित, तसेच इतर आरोपांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली गेली, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
११ मे रोजी काँग्रेस पक्षाने खोटे दावे करत केंद्रातील मोदी सरकारवर खोटे आरोप केले गेले, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित काही आरोप केले होते. या आरोपांचा उल्लेख करत हे आरोप चुकीचे असल्याचे एफआयआरमध्ये म्हटलेय. सोनिया गांधी यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १५३, ५०५ अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतत मोदी सरकारवर आरोपांचा करत आहे. मोदी सरकार राज्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही काँग्रेस करत आहे. पंतप्रधान केअर्स फंडाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी आरोप करत असताना भाजपकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.