नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या पीतमपुरा भागातील कोहाट एनक्लेवमधील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. फ्लॅटमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की काही वेळात त्या आगीने संपूर्ण इमारतीला वेढा घातला. या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नागपाल कुटुंबातील राकेश, त्यांची पत्नी टीना, मुलगा दिव्यांश आणि मुलगी श्रेया चौघांचा या आगीत मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या चौघांचा मृत्यू गुदमरुन झालाय 


घरातून बाहेर पडू शकले नाही नागपाल कुटुंब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार कोहाट एनक्लेवमध्ये तीन वाजण्याच्या सुमारास एका घरात आग लागली. ही आग इतकी भीषण होती की घरातील लोकांना बाहेर पडण्यास संधीच मिळाली नाही. फ्लॅटमध्ये लागलेली आग पाहिल्यानंतर तेथील चौकीदाराने इर्मजन्सी बेल दाबली. त्यामुळे इमारतीतील इतर लोक खाली आले. मात्र नागपाल कुटुंबातील सदस्य खाली येऊ शकले नाहीत. 



शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आग


रिपोर्ट्सनुसार घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. जेव्हा कुटुंबातील लोकांना समजले की आग लागलीये आणि बाहेर पडायला हवे तोपर्यंत घरात सर्वत्र धूर पसरला होता. ज्यामुळे गुदमरुन चारही जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 


तिघांना अग्निशमन दलांच्या अधिकाऱ्यांनी वाचवले


मीडिया रिपोर्ट्सनुसार या दुर्घटनेत अडकलेल्या ३ लोकांना वाचवण्यात यश आले. काहींना रोहिणीच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार बिल्डिंगमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.