शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा अग्नितांडव! कोचमध्ये आगडोंब, व्हिडीओ
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
लखनऊ: शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. लगेज बोगीमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला. या आगीनं पाहता पाहता रौद्र रुप धारण केलं. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील सिंह यांची दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7 च्या सुमारास दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्स्प्रेस गाडीच्या बोगीत आग लागल्याची माहिती मिळाली. तत्काळ माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मागच्या बाजूला असलेल्या जनरेटर आणि लगेज बोगीत ही आग लागली होती.
तत्काळ इतर बोगींना वेगळं करण्यात आलं आणि अग्निशमन दलाला तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. याआधी 13 मार्च रोजी दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये लाग लागल्याची घटना समोर आली होती. ही घटना नुकतीच ताजी असताना पुन्हा एकदा हा प्रकार घडला आहे.
13 मार्च रोजी शताब्दी एक्स्प्रेसच्या सी 5 कोचला आग लागली होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये त्यावेळी तारांबळ उडाली होती. एका प्रवाशानं ट्रेनची चेन खेचून याबाबत माहिती दिली होती. या आगीत सुदैवानं कोणतंही नुकसान झालं नाही. मात्र पुन्हा आठवड्याभरानंतर शताब्दी एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्यानं खळबळ उडाली आहे.