नोएडा : नोएडातील सेक्टर ११ मधील मेट्रो रूग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. रूग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्याचे समजताच रूग्णालयाच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूग्णालयाच्या इमारतीत आग लागल्यानंतर तेथील रूग्णांमध्ये मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाच्या काचा फोडून रूग्णांना बाहेर काढले. दरम्यान, या आगीत कोणतीही दुर्घटना झाल्याचे वृत्त नाही. 



 



दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आग लागली त्यावेळी काही रूग्णांवर शस्त्रक्रिया सुरू होती. परंतु आग लागल्याचे समजताच त्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच गंभीर रूग्णांना बाहेर काढून त्यांना दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रूग्णालायाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. अद्याप आगीचे कारण समजू शकले नसून आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.