फरीदाबाद : हरियाणातील फरीदाबादमधील एका खासगी शाळेला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. फरीदाबादमधील डबुआ कॉलनीमध्ये असणाऱ्या या खासगी शाळेला शनिवारी सकाळी सात वाजता भीषण आग लागली. शाळेच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या शाळा संचालकाचे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्षस्थानी आले. या आगीत शाळा संचालकाची दोन मुले आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी सकाळी डबुआ येथील एएनडी कॉलनीतील शाळेच्या इमारतीला अचानक आग लागली. शाळेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या शाळा संचालकाच्या कुटुंबातील तीन जणांचा आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. शाळेच्या इमारतीतून काळा धूर पसरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. स्थानिकांनी तातडीने मदत करण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलालाही याबाबात माहिती देण्यात आली. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु करण्यात आले.


आगीत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक समस्या येत होत्या. पोलीस आणि अग्निशमन दलाने दुसऱ्या मजल्यावरील खिडकी तोडून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संपूर्ण प्रयत्न करुनही तिघांना वाचवण्यात यश आले नाही. 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी विजेच्या तारांचे मोठे जाळे पसरले आहे. रस्त्यांवर ट्रान्सफॉर्मरही आहेत. अनेक वेळा या भागात आगीचे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. याबाबत अधिक चौकशी सुरु असून चौकशीनंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.