राहुल गांधींच्या रोड शोमध्ये स्फोट, थोडक्यात बचावले
मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी थोडक्यात बचावले आहेत.
जबलपूर : मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी थोडक्यात बचावले आहेत. जबलपूरमध्ये राहुल गांधींचा रोड शो सुरु असताना स्फोट झाला. राहुल गांधींच्या स्वागतासाठी आणलेल्या फुग्यांना आग लागल्यामुळे हा अपघात झाला. आगीच्या या ज्वाळा राहुल गांधींपर्यंत पोहोचायच्या आत राहुल गांधींना दुसरीकडे हलवण्यात आलं.
राहुल गांधी शनिवारी जबलपूरमध्ये रोड शो करत होते. शास्त्री ब्रिजवर कार्यकर्त्यांनी फुग्यांची सजावट केली होती. राहुल गांधींचा रोड शो जसा तिकडे पोहोचला तशी या फुग्यांना आग लागली आणि स्फोट झाला. ही आग दिव्यांमुळे लागली असल्याचं बोललं जातंय. हे दिवे राहुल गांधींची आरती करण्यासाठी आणण्यात आले होते. हे दिवे आणि फुग्यांचा संपर्क झाल्यामुळे आग लागून स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीशी संपर्क झाल्यानंतर हे फुगे जोरात फुटायला लागले. आगीच्या या ज्वाळा राहुल गांधींपर्यंत पोहचल्या. यावेळी राहुल गांधींसोबत मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथही होते. या दोन्ही नेत्यांना अपघाताच्या ठिकाणावरून सुरक्षित दुसरीकडे नेण्यात आलं. आगीच्या या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला आणि स्वागत मंच तुटला.