मुंबई : काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हिरव्या बुरशीचा एक रुग्ण आढळला आहे. 33 वर्षीय रूग्णाच्या फुफ्फुसांची तपासणी केली असता देशात हिरव्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण आढळले आहे. तपासणीत पुष्टी झाल्यानंतर रुग्णास मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागाचे अधिकारी अपूर्व तिवारी यांनी सांगितले की, रुग्णाच्या फुफ्फुसांच्या तपासणीत हिरव्या रंगाची बुरशी आढळली. रंगाच्या आधारे त्याला हिरवी बुरशी असे नाव देण्यात आले. यापूर्वी, देशातील बर्‍याच भागात काळ्या बुरशीचे, पांढर्‍या बुरशीचे आणि पिवळ्या बुरशीचे संसर्ग झालेल्या रूग्णांची नोंद आहे. देशातील हिरव्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण आहे.


33 वर्षाच्या रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यामध्ये हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे आढळले. दीड महिन्यापूर्वी जेव्हा या रुग्णाला प्रथम अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या उजव्या फुफ्फुसात पू झाला होता. डॉक्टरांनी पू काढून टाकले, परंतु त्याची प्रकृती सुधारली नाही. त्याचा ताप 103 अंशांपेक्षा कमी होत नव्हता. मंगळवारी रुग्णाला चार्टर्ड विमानाने मुंबईला रवाना करण्यात आले.


इंदूरमधील कोरोनाची दुसरी लाट आता कमकुवत झाली असली तरी काळ्या बुरशीच्या (म्यूकरमायकोसिस) रूग्णांची संख्या कमी होत नाही. इंदूरच्याच एमवाय हॉस्पिटलमध्येच काळी बुरशीचे 308 रुग्ण दाखल आहेत. याशिवाय 200 पेक्षा जास्त रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.