जगाला धडकी भरवणाऱ्या `ओमिक्रॉन व्हेरिएंट`चा पहिला फोटो समोर, डेल्टापेक्षाही आहे घातक
कोरोनाचं नवं संकट नेमक्या कोणत्या रुपात आहे हे कळायला या फोटोमुळे मदत होणार आहे
रोम : इटलीतील संशोधकांनी कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन'चे (Omicron)पहिले चित्र प्रसिद्ध केले आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त म्युटेशन असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जगभरात खळबळ माजवणारा हा प्रकार किती संसर्गजन्य आणि जीवघेणा आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
'ओमिक्रॉन' डेल्टापेक्षा घातक
रोममधील बम्बिनो गेसु रुग्णालयाने ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron) फोटो प्रसिद्ध केला आहे. (Bambino Gesù Children's Hospital)ओमिक्रोन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्यूटेट होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे बहुतांश म्युटेशन्स हे मानवी पेशींशी संवाद होणाऱ्या भागात सापडले आहेत. शरीराच्या इतर भागात हा विषाणू कसा प्रभाव टाकतं याचा अभ्यास अजून होणे बाकी आहे.
चित्रात दिसणारी लाल वर्तुळे विषाणूचं बदलत रुप दाखवतात. संशोधकांनी सांगितले की, 'पुढील अभ्यासातून हे दिसून येईल की नवीन विषाणू तटस्थ आहे, कमी धोकादायक आहे की अधिक धोकादायक आहे.' जगावर आलेलं कोरोनाचं हे नवं संकट नेमक्या कोणत्या रुपात आहे हे कळायलाही फोटोमुळे मदत होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनचे आतापर्यंत 13 देशात रुग्ण आढळलेले आहेत. पुढच्या काही काळात यात झपाट्यानं वाढ होऊ शकते असा अंदाजही वर्तवला जात आहे.
देशात खबरदारीचे उपाय
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन आणि अधिक संसर्गजन्य प्रकार आढळून आल्यानंतर देशातही चिंतेचे वातावरण वाढलं आहे. महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्यांवर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि त्यांची कोरोना चाचणीही केली जाणारआहे. गुजरात सरकारने परदेशी प्रवाशांसाठीही पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आंतरराष्ट्रीय प्रवासावर लक्ष ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.